शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे बंद पडलेले काम सुरू करण्याची तयारी या कंत्राटदाराने दाखवली असली तरी या योजनेचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. महानगरपालिकेत वरील निर्णय होत असतानाच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने या याजेनेंतर्गत झालेल्या कामाच्या चौकशीचा निर्णय घेतला असून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-यांच्या एकसदस्यीय समितीमार्फत ही चौकशी करण्याची शिफारस परिषदेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या योजनेचे काम गेल्या महिना-दीड महिनाभरापासून बंद आहे. संबंधित ठेकेदारानेच हे काम बंद केले आहे. शहरात त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे. दरम्यान महापौर तथा आमदार संग्राम जगताप व मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी सोमवारी या कंत्राटदाराशी चर्चा करून यातून यशस्वी मार्ग काढला. मे. तापी प्रीस्टेड प्रॉडक्ट या कंपनीने हे काम घेतले आहे. कंपनीचे संचालक किशोर अग्रवाल यांनी चर्चेनंतर हे काम पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली.
असे असले तरी यातील अडचणी वाढण्याचीच चिन्हे आहेत. प्रमोद मोहळे यांनी या योजनेच्या कामाबाबत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेकडे तक्रार केली असून परिषदेच्या सोमवारी झालेल्या या बैठकीत त्यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मोहळे हेही उपस्थित होते. या बैठकीत यावर तपशीलवार चर्चा झाली. या तक्रारीतील गंभीर मुद्दे लक्षात घेऊन सुधारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत आत्तापर्यंत झालेल्या कामांची चौकशी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-यांच्या एकसदस्यीय समितीमार्फत ही चौकशी करण्यात येणार असून तशी शिफारस अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव यांनी जिल्हाधिका-यांना करणार आहेत. आपल्या तक्रारीतील प्रत्येक मुद्दय़ाच्या अनुषंगाने ही चौकशी व्हावी, अशी मागणी मोहळे यांनी केली असून चौकशी प्रक्रियेत आपल्यालाही समाविष्ट करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सव्वाशे कोटींची योजना
नगर शहराची पुढील ४० वर्षांतील लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या यूआयडीएसएसएमटी या योजनेतून हे काम सुरू आहे. एकूण योजना सुमारे १२६ कोटी रुपयांची असून त्यातील ५५ कोटी रुपये या कंपनीला आत्तापर्यंत अदा केले आहेत.