जिल्हा नियोजन मंडळावर नगरच्या महापालिका क्षेत्रातून (मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोसले, शिवसेनेच्या सुरेखा कदम व काँग्रेसचे सुनीलकुमार कोतकर यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. मात्र नगरपालिका (लहान नागरी निर्वाचन क्षेत्र) क्षेत्रातून एका जागेसाठी तीन उमेदवारांचे अर्ज राहिल्याने आता त्यासाठी दि. ३० डिसेंबरला निवडणूक होईल, त्यासाठी १७३ मतदार आहेत.
नियोजन मंडळाच्या चार जागांवरील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज, सोमवारी अंतिम मुदत होती. मनपा क्षेत्रातून तीन जागांसाठी २१ जणांनी तर पालिका क्षेत्रातील एका जागेसाठी ८ अर्ज दाखल झाले होते. नगरच्या मनपा क्षेत्रातील तीन जागांवर बिनविरोध निवडीसाठी महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांनीच पुढाकार घेतला होता.
मनपाच्या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून अभिषेक कळमकर, श्रीकांत छिंदम, संपत बारस्कर, कुमार वाकळे, विपुल शेटिया, सचिन जाधव व सुनीलकुमार कोतकर या ७ जणांनी अर्ज मागे घेतल्याने गणेश भोसले यांचा एकमेव अर्ज राहिला. सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आशा पवार, इंदरकौर गंभीर, मंगला गुंदेचा, नीता घुले, उषा ठाणगे, नंदा साठे, सुनीता भिंगारदिवे, मनीषा बारस्कर व कलावती शेळके या ९ जणींनी अर्ज मागे घेतल्याने केवळ सुरेखा कदम यांचाच अर्ज रिंगणात राहिला. नागरिकांच्या मागास प्रवर्गातून उषा नलावडे, श्रीपाद छिंदम व अजिंक्य बोरकर या तिघांनी अर्ज मागे घेतले, परिणामी केवळ सुनीलकुमार कोतकर यांचीच उमेदवारी कायम राहिली.
पालिका क्षेत्रातून पाच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आशिष धनवटे (श्रीरामपूर), भरतकुमार नहाटा (श्रीगोंदे) व दिनार कुदळे (कोपरगाव) या तिघांत लढत होईल. ही निवडणूक दि. ३० रोजी होईल. त्यासाठी जिल्हय़ातील ८ पालिकांतील १७३ नगरसेवक मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव व सहायक म्हणून प्रांताधिकारी वामन कदम काम पाहात आहेत. निवडणुकीचे मतदान जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रियदर्शनी सभागृहात होईल.