दिवसभर ऊन असताना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गारपिटीचा पाऊस सुरू झाल्याने उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील फळबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली, पाडोळी परिसरात सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह गारपीट झाली. दोन्ही गावांच्या परिसरात द्राक्षबागा नाहीत. मात्र आंबा, मोसंबी या फळबागांसह रब्बी ज्वारी, गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातही अचानकपणे झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

शिराढोण, गोविंदपूर, खामसवाडी, सौंदाना (अंबा), नायगाव व पाडोळी गाव व परिसरात गारांचा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आंबा, मोसंबी, द्राक्ष, हरभरा, ज्वारी, गहू व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिराढोण येथील शेतकरी राजेंद्र मुंदडा याच्या आंब्याची व संत्र्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी रोडलगतची झाडे देखील वादळी वार्‍यामुळे जमिनदोस्त झाली आहेत. एकीकडे करोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि दुसरीकडे शेतकर्‍यांपुढे निर्माण झालेले अवकाळी पावसाचे संकट यामुळे शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे.