हेमेंद्र पाटील

सरकारी आणि आदिवासी जागेवरील खदानींवर मोठय़ा प्रमाणात खोदकाम सुरू आहे. परवानगी नसलेल्या खदानींसाठी इतर खदानींचा स्वामित्वधन परवाना दाखवला जात आहे. त्याआधारे नागझरी परिसरात बेसुमार वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

बोईसर पूर्वेला नागझरी, लालोंडे, गुंदले, किराट आणि निहे या संपूर्ण भागात बेसुमार दगड खदानींचे खोदकाम सुरू आहे. नागझरी येथील सव्‍‌र्हे क्रमांक १५० येथे शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जागेवर बेसुमार खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम इतर सव्‍‌र्हे क्रमांकावरील खदानींच्या स्वामित्वधन परवान्यांचा वापर करून केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या भागातील जास्तीत जास्त खदानींची खोली प्रमाणाहून अधिक आहे. अशा खदानींना स्वामित्वधनाचा परवाना नियमानुसार देता येत नाही. परंतु तहसीलदार, पालघर यांच्याकडून खदानींचे मोजमाप न करताच आणि खोदकाम झालेल्या जागेचा पंचनामा न करताच परवाने दिले जात आहेत.

राज्याच्या गौण खनिकर्म विभागाच्या नियमांनुसार कोणत्याही खदानीचे खोदकाम हे २० फुटांहून अधिक खोल असू नये, तरीही अनेक खदानी प्रमाणापेक्षा अधिक खोलवर गेल्या आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधील विहिरी आणि कूपनलिका उन्हात कोरडय़ा पडत असल्याचे आजवरच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. तरीही अनेक बेकायदा खदानींना नियमबाह्य़ स्वामित्वधन परवाने दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ग्रामस्थांच्या मते, महसूल विभागाने येथील स्वामित्वधन परवाने रद्द करायला हवेत; परंतु त्या संदर्भात अद्याप कार्यवाही झालेली नाही.

पालघर महसूल विभागाकडून दोन वर्षांपूर्वी बोईसर पूर्वेकडील खदानींचे मोजमाप करण्यात आले होते. यात खदानमाफियांना कोटय़वधी रुपयांच्या दंडांची ताकीद महसूल विभागाने दिली होती. तरीही तत्कालीन तहसीलदारांनी वेळ मारून नेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

खदानींना दिलेल्या स्वामित्वधन परवान्यांच्या तपासण्यांसाठी पालघर तहसीलदार यांना सांगण्यात आले आहे. बेकायदा खदानींबाबत चौकशी तहसीलदार करीत आहेत. यातील दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तलाठय़ांचा पंचनामा असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा स्वामित्वधन परवाना दिला जाणार नाही.

– धनाजी तोरसकर, उपविभागीय अधिकारी, पालघर