वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे नाव आहे. प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नुकतेच महाविकास आघाडीत समील झाला आहे. या युतीनंतर आता काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी वैचारिक मतभेद असलेल्या भाजपासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याआधी राष्ट्रपतीपदासाठी मला विचारण्यात आले होते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ते ‘लोकशाही’ या मराठी वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्याआधी भाजपाने या पदासाठी माझ्याकडे विचारणा केली होती. तुम्ही लवकरच वयाचे ७० वर्षे पूर्ण करणार आहात. त्यामुळे तुम्हाला आता राष्ट्रपती व्हायला आवडेल का? असे मला भाजपाने विचारले होते. तर मी त्यांना माझ्याकडून अजूनही १० वर्षे शिल्लक आहेत, असे सांगितले होते. मला तुम्ही राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात का? २०२४ मध्ये सर्व पक्षांनी चांगली कामगिरी केली तर चित्र वेगळे असू शकते. मी तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या, असेही मी त्यांना म्हणालो होतो,” असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला.

“मविआ संपुष्टात येणार नाही अशी आशा”

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. ९ फेब्रुवरी रोजी उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल या पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपाप्रणित एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी इंडिया अलायन्सप्रमाणे संपुष्टात येणार नाही, अशी आशा व्यक्त केली होती.

“मविआला ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला”

“भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य असून, याच हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षांना ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले होते.