पुण्यातील वसंतदादा शुगर इन्सिट्यूटची सर्वसाधारण वार्षिक सभा वेगळ्याचं घटनांमुळे चर्चेत आली. पहिली म्हणजे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट. तर दुसरी म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट. या भेटीवरून वेगवेगळे तर्क लावले जात असताना मोहिते पाटलांनी पुन्हा राष्ट्रवादी परतण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा मेगाभरती झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपात सामील झाले. यात राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील याचाही समावेश होता. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, पुढे विजयसिंह मोहिते पाटील यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. पण, त्यांनी राष्ट्रवादीसंदर्भातील भूमिकाही गुलदस्त्यात ठेवली होती.

राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. राज्यातील सत्तांतर घडून आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं भाजपाला शह देत सरकार स्थापन केलं. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा बदलू लागलं आहे. बुधवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि हर्षवर्धन पाटीलही उपस्थित होते. कार्यक्रमाला सुरूवात होण्यापूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या व्यासपीठावरच बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मात्र, मोहिते पाटील यांनी गौप्यस्फोट करत परतीचे संकेत दिले. “मी राष्ट्रवादीतच आहे,” असं ते म्हणाले. त्यांची ही भूमिका भाजपाला धक्का देणारी ठरणार आहे.