आर्थर रोड तुरुंगात छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा भुजबळ कुटुंबीयांनी फेटाळून लावला आहे. दमानिया यांनी केलेले आरोप निराधार असून छगन भुजबळ यांचा तुरुंगातच मृत्यू व्हावा अशी दमानिया आणि त्यांच्या साथीदारांची इच्छा आहे. यासाठीच असे आरोप करुन नाहक दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भुजबळ कुटुंबीयांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना तुरुंगात चिकन मसाला, दारु आणि फळ दिले जात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी भुजबळ यांच्यावतीने प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. यात भुजबळ कुटुंबीयांनी दमानिया यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तुरुंगात भुजबळांसाठी मोठ्या स्क्रीनचा टीव्ही लावण्यात आल्याचा दावा दमानियांनी केला होता. यावर भुजबळ म्हणतात, तुरुंगात इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी आहे. जेलमधील सुरक्षा रक्षकही उपकरण आत नेऊ शकत नाही. पीटर मुखर्जींनी बायोग्राफीसाठी लॅपटॉपची मागणी केली होती. ही मागणीही फेटाळून लावण्यात आली होती. प्रत्येक वॉर्डात एक छोटा टीव्ही असतो आणि यावर फक्त दुरदर्शनच्या वाहिन्याच दिसतात असे भुजबळांनी स्पष्ट केले.

समीर भुजबळांसाठी आर्थर रोड तुरुंगात नारळ पाण्यातून व्होडका नेली जाते असे दमानियांचे म्हणणे होते. यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले. तुरुंगात नारळपाणी, ब्रेड, केक असे कोणतेही पदार्थ नेण्याची मुभा नसते. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना बॅरेक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात आले आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि हे फुटेज कधीही तपासून बघता येतील असा दावाही भुजबळांनी केलाआहे. न्यायालयाच्या आदेशानुसार छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना आरोग्याच्या दृष्टीने घरातील जेवण दिले जाते. घरातून येणारे खाद्यपदार्थ एकाच वेळी खायचे की ठराविक अंतराने याचा नियम नाही. त्यामुळे जेवणावरुन खळबळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

भुजबळ कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी असे आरोप केले जात आहे. अशा आरोपांमुळे सरकारी यंत्रणावर नाहक दबाव येतो असे पत्रकात म्हटले आहे. छगन भुजबळ यांना त्रास व्हावा आणि त्यांचा तुरुंगातच मृत्यू व्हावा अशी दमानिया आणि त्यांच्या साथीदारांची इच्छा आहे. पण छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची एक दिवस निर्दोष सुटका होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.