दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा तर्फे जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने निर्मल गणेश विसर्जन कुंडाची ऑक्सिजन पार्क, हनुमान टेकडी, आर्वी रोड, वर्धा येथे निर्मिती केली गेली आहे. करोनाच्या जागतिक महामारीच्या काळात आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन हे शक्यतो घरीच करण्याचे आवाहन देखील वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने वर्धेकारांना करण्यात आलेले आहे.

मात्र, काही कारणास्तव किंवा मोठ्या मूर्ती असल्याने विसर्जन घरी करणे शक्य होत नसल्यास, या मूर्ती विसर्जनासाठी हनुमान टेकडीवरील निर्मल विसर्जन कुंडात घेऊन येऊ शकता, असे सांगण्यात आले आहे. त्यासाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत.

नागरिकांनी मूर्तीची पूजा-आरती घरीच करावी, मूर्तीचे विसर्जन करून परिसरात न थांबता लगेच घरी निघून जावे, एका गणेश मूर्तीसोबत केवळ दोन व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.परिसरात मास्क लावूनच यावे व सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, सर्वांनी येण्यापूर्वी आपल्या नावाचे दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करून घ्यावे व दिलेल्या वेळेनुसार आपण यावे, असे सांगण्यात आले आहे. कृपया सर्वांनी वरील सूचनांचे पालन करून निर्मल गणेश विसर्जन मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचातर्फे करण्यात येत आहे