या जिल्ह्यातील १ हजार ८३६ गावांपैकी ९५२ गावे फ्लोराईडयुक्त पाणी पुरवठा होणारी असल्याची धक्कादायक माहिती आहे. यातही भद्रावती व वरोरा या दोन तालुक्यात सर्वाधिक गावे असून दात पिवळे पडणे, हातपाय वाकडे होणे, हाडे कमजोर पडणे, चेहऱ्यावर व्यंगत्व येणे आदी आजार हे पाणी प्यायल्यामुळे होतात.
या जिल्ह्यात जमीन आणि वायू प्रदूषणासोबतच जल प्रदूषण मोठय़ा प्रमाणात आहे. वर्धा, इरई, झरपट, वैनगंगा व पैनगंगा या बहुतांश नद्यांचे पाणी प्रदूषित आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश गावातही दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे निरीक्षण भूजल विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या पथकाने जिल्ह्यातील १ हजार ८३६ गावांचे सर्वेक्षण केले असता त्यात ९५२ गावे फ्लोराईडयुक्त पाणी असलेली आढळून आली. जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी वरोरा व भद्रावती या दोन तालुक्यांमध्ये फ्लोराईडयुक्त गावांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिंपरी, चंद्रपूर या तालुक्यातील काही गावांमध्येही हेच पाणी असलेली गावे आहेत. फ्लोराईडचे पाणी नदीनाल्याला नाही, तर हातपंप, कुपनलिका व नैसर्गिक स्त्रोतातील झऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक असले की, दात पिवळे पडणे, हातपाय वाकडे होणे, हाडे कमजोर होणे, तसेच चेहऱ्यावर व्यंगत्व येणे यासारखे आजार बळावतात. आजही भद्रावती, वरोरा व राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अशा प्रकारचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात बघायला मिळतात. काही गावांमध्ये तर ग्रामीण पाणी पुरवठा योजनाच्या माध्यमातून याच पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात हे आजार बळावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी अशा गावांचे सर्वेक्षण केले जाते. मात्र, यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही गावांमध्ये हा आजार आणखीच बळावत आहेत.
केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज जिल्हा ग्रामीण व विकास यंत्रणेची आढावा बैठक घेतली असता त्यातही आमदारांनी फ्लोराईडग्रस्त पाण्याचा मुद्दा उचलून धरला. आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी फ्लोराईडग्रस्त पाण्यावर उपाययोजना करण्याची सूचना केली तेव्हा केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांनी फ्लोराईडग्रस्त गावांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.