आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपाबाबत फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युल्यावर चर्चा झालेली असताना शिवसेना याबाबत नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘जागा वाटपाच्या मुद्द्यांवरुन आमचं ठरलंय,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिवसेना नाराज नसल्याचे स्पष्ट केले. ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेच्या १८ खासदारांसोबत कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महसूलमंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान, निवडणुकीत साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरकरांचे आभार मानले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. विधानसभेच्या जागांबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘जागा वाटपाच्या मुद्द्यांवरुन आमचं ठरलंय. शिवसेना कोणत्याही गोष्टी चोरुन करीत नाही. दोन चार जागांसाठी आम्ही युती केलेली नाही हिंदुत्वासाठी युती केली आहे. काश्मीरचा मुद्दा केंद्राच्या अजेंड्यावर असल्याने आम्ही त्यासाठी युती केली आहे. यापूर्वी आम्ही भाजपाकडे नाराजी व्यक्त केलेली होतीच मात्र, आता सगळं चांगल चाललेलं आहे.’

दरम्यान, केंद्रातील एनडीए सरकारमध्ये शिवसेना हा भाजापानंतर सर्वाधिक जागा जिंकणारा मित्र पक्ष आहे. त्यामुळे लोकसभा उपाध्यक्षपद आपल्यालाच मिळावे अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘आम्ही भाजपाकडे हक्काने याबाबत मागणी केली होती. मात्र, या हक्काच्या मागणीला नाराजी समजण्यात येऊ नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी लोकसभा उपाध्यक्षपदाबाबत सूचकपणे दावा केला.

दुष्काळाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात दुष्काळी स्थितीत महायुतीच्या सरकारकडून चांगले काम झाले आहे. या परिस्थितीत पाणी साठ्याची मोठी चिंतेची बाब बनली आहे. मात्र, दुष्काळाचा हा शेवटचा टप्पा असावा तसेच लवकरात लवकर पाऊस पडावा अशी अपेक्षा करुयात. या आठवड्यात मराठवाडा आणि बाजूच्या काही भागाचा दुष्काळ दौरा आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. त्याचबरोबर अयोध्या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर करु असेही ते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.