सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक करुन त्याद्वारे युजर्सकडून खंडणी मागण्याचा नवा धंदा हॅकर्सने सुरु केल्याचे सायबर सेलने नागरिकांना सुचित केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळाल्यानंतर सायबर क्रूक्स (ऑनलाइन चोरटे) त्याला किंवा तिला त्यांचे आक्षेपार्ह फोटो पाठवून ते त्यांच्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमध्ये पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करीत आहेत. सायबर सेलने म्हटले की, “अशा प्रकारे अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये हॅकर पीडित युजर्सचे आक्षेपार्ह फोटो तो किंवा ती सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये टाकतात. त्यानंतर ते पीडिताच्या कॉन्टॅक्ट्सद्वारे त्याचे अकाउंट हॅक करुन त्याच्याकडे पैशांची मागणी करतात.

महाराष्ट्र सायबरने युजर्सना केले अलर्ट

जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप युजर आपला मोबाईल फोन बदलतात. तेव्हा त्यांनी याची खात्री करायला हवी की त्यांचा नवा फोन हा त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक झालेला आहे. हे लिंकेज व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोडद्वारे करता येते. मात्र, हे करताना हॅकरला युजर्सचा मोबाईल क्रमांक माहिती असतो. त्यामुळे, जर युजरने नकळत आपला व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोड कोणाशीही शेअर केला तर हॅकरला युजर्सच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळतो आणि अशा प्रकारे युजरचे अकाउंट हॅक होते. त्यानंतर हॅकरला पीडिताच्या सर्व संपर्क क्रमांकांचा तसेच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा ताबा मिळतो. त्यानंतर गुन्ह्यांची ही मालिका सुरु होते.

समजा तर पीडित युजरच्या संपर्क क्रमांकामधील सर्वाधिक संपर्क असलेला एखादा क्रमांक असेल तर हॅकर हे ताडतात आणि पीडित युजरला त्या सर्वाधिक संपर्क होणाऱ्या क्रमांकावरुन व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोड त्याच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे सांगतात. त्यामुळे पीडित युजर तो कोड आपल्या सर्वाधिक संपर्क असलेल्या क्रमांकावर पाठवतो. त्यानंतर तो हॅकरच्या जाळ्यात अडकतो.

तुमचं व्हॉट्सअप अकाउंट सुरक्षित करा

अशा गुन्ह्यांपासून सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा एजन्सीनं युजर्सना सल्ला दिला आहे की, युजर्सने आपला व्हेरिफिकेशन कोड कोणासोबतही शेअर करु नये. जर तुम्ही व्हेरिफिकेशन कोड शेअर केला तर त्यानंतर तात्काळ तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंड पुन्हा व्हेरिफाय करा. युजर्सने दोन स्टेपमधील व्हेरिफिकेशन नेहमी अ‍ॅक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अधिक सुरक्षित राहिल. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंक्स ओपन करु नका, असेही सायबर सेलने म्हटले आहे.