राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हय़ात मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. १८ वष्रे पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हय़ातील सर्व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येत्या नोव्हेंबर महिन्यात जिल्हय़ातील १० नगर परिषदांच्या, तर जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या वेळी सर्व १९ वर्षांवरील नागरिकांना मतदान करता आले पाहिजे म्हणून विशेष लक्ष देण्यात आले आहे. १ जानेवारी २०१६ रोजीपर्यंत यांची वयाची १८ वष्रे पूर्ण झाली आहेत त्यांची नावे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. ही मोहीम ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जन्म-मृत्यूच्या नोंदी तपासून ज्या व्यक्ती मयत झाल्या आहेत त्यांची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात येणार आहेत. स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची नावे वगळून ते सध्या ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या मतदारसंघात नोंदविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिली.
रायगड जिल्ह्य़ात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यात २० लाख ४० हजार ३४६ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यातील ९३.६५ टक्के मतदारांची छायाचित्रे मतदार याद्यांमध्ये आहेत. ९४.७९ टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार याद्यांमध्ये नाहीत त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे सर्व मतदारांची छायाचित्रे मतदार याद्यांमध्ये घेऊन मतदार याद्या अद्ययावत करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.