हिंगोली: दिवाळीच्या दिवशी शेतावर रोजमजुरीने कामावर गेलेल्या बोथी येथील निर्मला डुकरे यांचा डुकराने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेची चर्चा सुरू असतानाच शेवाळा शिवारात मंगळवारी कोल्ह्याने सात जणांना चावा घेतला. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सर्व जखमींना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यातआले आहे. दिवसेंदिवस वन्य प्राण्याकडून होणाऱ्या हल्ल्याने शेतकरी मात्र त्रस्त झाला असून याचा बंदोबस्त करण्याची मागणी वाढत आहे.

हेही वाचा >>> “१०० रुपयांत दिवाळी ही कुचेष्टाच…”, ‘आनंदाचा शिधा’वरून भास्कर जाधवांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे सोमवारी सकाळी कोंडबाराव काळे यांच्या शेतात सोयाबीन काढण्यासाठी मजुरीने गेलेल्या निर्मलाबाई दत्तराव डुकरे यांच्यावर डुकराने हल्ला केला होता. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.  त्यांना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ऐनदिवाळीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेनंतर बोथी गावावर शोककळा पसरली होती.

हेही वाचा >>> “शिंदे साहेब तर फक्त डिलीव्हरी बॉय निघाले, शिवसेनेतून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला!

या घटनेची जिल्हाभर चर्चा सुरू असतानाच मंगळवारी कळमनुरी तालुक्यातील शेवाळाशिवारात कयाधू नदीच्या बाजूलाच काही गावकऱ्यांचे शेत आहे. त्यामुळे बहूतांश गावकरी सकाळी शेतात चक्कर मारण्यासाठी जातात तर काही गावकरी या भागात फिरण्यासाठीही येतात. नेहमीप्रमाणे काही गावकरी शेतात चक्कर मारण्यासाठी जात असतांना  कोल्हयाने रस्त्याने जाणाऱ्या या गावकऱ्यांवर हल्ला करण्यास सुरवात केली. कोल्ह्याच्या या हल्ल्यामध्ये सात जण जखमी झाले. यामध्ये संजय सावंत, शंकर मारोती सुर्यवंशी, दीपक लक्ष्मण सुर्यवंशी, सीमा दत्तराव सूर्यवंशी, युवराज मुधकर नरवाडे यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. या सर्वांच्या पायाला कोल्ह्याने चावा घेतल्याचे सांगण्यात आले असून त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, वन विभागाने या भागात असलेल्या कोल्ह्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.