संगमेश्वर परिसरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी आठवडा बाजाराच्या परिसरात हक्काची जागा नियमितपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी महिला बचत गट उत्तम दर्जाची वैविध्यपूर्ण उत्पादने करत असली तरी या उत्पादनांना नियमित बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे अपेक्षित विक्री आणि नफा होत नाही, असा अनुभव आहे. मात्र ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमार्फत संगमेश्वर विभागातील लघुउद्योग सल्लागार चमूने संगमेश्वर परिसरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थाना स्थानिक बाजारपेठेत स्थान मिळावे, या हेतूने गेल्या १६ डिसेंबर रोजी संगमेश्वरच्या आठवडा बाजारात भव्य मंडप उभारून प्रायोगिक तत्त्वावर या वस्तूंचा विक्री मेळावा आयोजित केला. नावडी ग्रामपंचायतीच्या सरपंच नम्रता शेटय़े, उपसरपंच संजय कदम, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी प्रदीप कामत, जिल्हा व्यवस्थापक योगेश पाटील इत्यादींच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन झाले. येथे मांडण्यात आलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थाना ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
हा अनुभव लक्षात घेऊन जीवनोन्नती अभियानाचे लघुउद्योग सल्लागार नीलेश कदम यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने व सहकार्याने हा उपक्रम नियमितपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्यापासून (३० डिसेंबर) दर बुधवारी संगमेश्वरच्या आठवडा बाजारात या परिसरातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थाची विक्री होणार आहे.
महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वयंसेवी संस्था किंवा शासनातर्फे वेळोवेळी प्रदर्शने आयोजित केली जातात.
मात्र त्यांचा कालावधी मर्यादित असतो आणि त्या काळात संबंधित गटांच्या महिलांना सलग काही दिवस घराबाहेर राहून सहभागी व्हावे लागते. मात्र अशा प्रकारे आठवडा बाजारात नियमित विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध झाल्यास जास्त सोयीचे ठरणार आहे. तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांची नियमित उलाढालही शक्य होणार आहे.