09 December 2019

News Flash

व्हाय शुल्ड बॉइज हॅव ऑल द फन? आता ‘गर्ल्स’ही करणार धमाका!

मुली कधीच एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी असू शकत नाही

‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ या दोन्ही चित्रपटांमधून किशोरवयीन आणि महाविद्यालयीन मुलांच्या जीवनातील चित्र रेखाटण्यात आलं होतं. या चित्रपटातून गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्माल मस्ती पाहता आली होती. मात्र आता या मुलांच्या धमाल-मस्तीनंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर पुन्हा एकदा अशाच आशयाचा परंतु नव्या धाटणीचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, त्यांच्या या चित्रपटामध्ये मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची धमाकेदार सफर घडवली जाणार आहे.

विशाल देवरुखकर यांचा आगामी चित्रपटाचं नाव ‘गर्ल्स’ असं असून या चित्रपटाची निर्मिती अ कायरा कुमार क्रिएशन प्रॉडक्शनअंतर्गत करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटांमध्ये तरुणांवर आधारित, त्यांच्या शाळा, कॉलेज जीवनावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र तरुणींच्या जीवनावर आधारित फार कमी चित्रपटांची निर्मिती झाली आहे. त्यांच्या जीवनातील मज्जा-मस्ती कधीच स्पष्टपणे पडद्यावर साकारण्यात आली नाही. त्यामुळेच ही मज्जा-मस्ती लवकरच ‘गर्ल्स’ चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

“असं म्हणतात मुलांसारख्या मुली कधीच एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी असू शकत नाही. मात्र हे साफ चुकीचे आहे. मुलींसारखी मैत्री आणि त्या मैत्रीत होणारी धमाल ही कुठेच पाहायला मिळत नाही. ‘व्हाय शूड बॉइज हॅव ऑल द फन’ या वाक्याला मात देत, मुली सुद्धा मुलांएवढीच किंवा मुलांपेक्षा जास्त मज्जा करू शकतात. मुलींमध्ये होणारे संभाषण त्यांच्यात होणारे किस्से हे फक्त मुली स्वतः पुरताच ठेवतात. बऱ्याच लोकांना त्यांच्या या विश्वाबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. याच उत्सुकतेचे उत्तर ‘गर्ल्स’ या चित्रपटातून मिळणार आहे. ‘गर्ल्स’ हा चित्रपट तरुणींच्या अवतीभवती फिरणारा आणि त्यांचे भावविश्व उलगडणारा मराठीतील पहिला सिनेमा असणार आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही”, असं विशाल देवरुखकर म्हणाले.

दरम्यान, या चित्रपटातून नक्की कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा होणार, कोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार हे मात्र अद्यापतरी गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाती निर्मिती नरेन कुमार, सुजाता एन. कुमार करत आहेत.

First Published on August 14, 2019 6:05 pm

Web Title: after boys and boys 2 movie next marathi movie girlz ssj 93
Just Now!
X