प्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने याची प्रस्तुती असलेला ‘चुंबक’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर अस्सल मराठीत अक्षयने चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाचा ट्रेलरही स्वतः अक्षयने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढली आहे. नुकतीच या चित्रपटातील गाणी प्रकाशित करण्यात आली असून या गाण्यांना संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामधील पहिले गाणे “खेचा खेची, गडबड गोची” हे असून ते स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. या गाण्याला ओमकार कुलकर्णी यांनी शब्दांकित केले असून साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे. तर दुसरे गाणे “चुंबक चिटक चिटकला चुंबक” हे गाणे बॉलीवूडमधील आघाडीचा गायक दिव्या कुमार याने गायले आहे. या शीर्षक गीताचे बोल मराठी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, विभावरी देशपांडे हिने लिहीले आहेत. अशाप्रकारे सिनेमाकरीता गाणे लिहीण्याचा विभावरी हिचा पहिलाच प्रयत्न आहे. या गाण्यांची संगीत रचना अमर मंग्रुलकर यांची आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास चित्रपट सज्ज असल्याचे चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून सांगण्यात आले. दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले प्रख्यात गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असून प्रमुख भूमिका असलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून अरुणा भाटीया, केप ऑफ गुड फिल्म आणि कायरा कुमार क्रिएशनच्या नरेन कुमार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

‘गीतकार म्हणून चुंबक चित्रपटातील हे माझे पहिलेच व्यावसायिक गाणे आहे. या गाण्यातील शब्द साधे आणि सोपे असावेत इतकेच मला सांगण्यात आले होते असे विभावरीने आपल्या पहिल्यावहिल्या गाण्याबाबत बोलताना सांगितले. माझ्यापरीने मी हे काम चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांना हे गाणे नक्कीच आवडेल’ अशी आशाही तिने यावेळी व्यक्त केली. हे गाणे मुख्यत: नायकाच्या भूमिकेबद्दल आहे. नायकाच्या आयुष्यात काय घडते, तो कशामुळे असे वागतो याबद्दल सांगण्यात आले आहे. या गाण्यांच्या शब्दांवर खुप चर्चा करून शेवटी आम्ही दिव्या कुमार याचे नाव नक्की केले’ असे मत म्युझिक कम्पोजर अमर मंग्रुलकर यांनी व्यक्त केले.

बॉलीवूडमधील आघाडीचा गायक दिव्या कुमार म्हणाला की ‘मी पहिल्यांदाच अमर सरांना चुंबक चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने भेटलो. मराठी गाण्यात भरपूर विविधता आहे. “चुंबक चिटकला चुंबक” हे गाणे खुपच मजेदार झाले आहे आणि मला हे गाणे गाताना मजा आली’. स्वानंद किरकिरेने यातील प्रसन्नाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सोलापूरमधील एका छोट्या गावातील गतिमंद आणि सरळसाध्या अशा व्यक्तीची ही भूमिका आहे. स्वानंद अगदी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. यातील तीन डिस्कोची भूमिका कोल्हापूरच्या संग्राम देसाईने तर बाळूची भूमिका पुण्यातील साहिल जाधवने साकारली आहे.