‘ऑल द बेस्ट’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर अनेक नवे ट्रेण्ड्स आणले असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मराठी नाटक शब्दबंबाळ, गोष्टीत अडकलेलं असतं असा जो आक्षेप नेहमीच घेतला जातो त्यात नक्कीच तथ्य आहे; परंतु ‘ऑल द बेस्ट’मध्ये मुका, बहिरा आणि अंध यांनाच प्रमुख पात्रं योजून नाटक घडविण्याचं भलतंच साहस लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी केलं आणि ते कमालीचं यशस्वी झालं. या ‘विशेष’ पात्रांचा देहबोलीयुक्त परस्परसंवाद हाच या नाटकाचा ‘यूएसपी’ ठरला. एकांकिका ते पूर्ण लांबीचं नाटक.. त्याचे एकाच वेळी निरनिराळ्या कलावंतांच्या संचातले धडाकेबाज प्रयोग, नाटकाच्या अन्यभाषिक रूपांतरांना मिळालेलं तेवढंच घवघवीत यश, प्रयोगसंख्येचा उच्चांक, स्त्री-पात्रांच्या संचातील ‘ऑल द बेस्ट’, सलग वीसेक वर्षे तीन-चार पिढय़ांतील रंगकर्मीनी या नाटकातून आपल्या करिअरची केलेली सुरुवात आणि नंतर त्यांच्या करिअरने घेतलेली झेप.. असे अनेक यशाचे तुरे ‘ऑल द बेस्ट’च्या शिरपेचात विराजमान आहेत. हिंदी चित्रपटासाठीही त्याचे हक्क विकत घेतले गेले. देवेंद्र पेम यांना लेखक-दिग्दर्शक म्हणून या नाटकानं एवढं भरभरून यश दिलं, की तेच त्यांच्या कारकीर्दीतला मोठा अडथळा ठरलं. त्यानंतर ‘लालीलिला’सारखं लक्षवेधी नाटक देऊनही देवेंद्र पेम आणि ‘ऑल द बेस्ट’ हेच अभिन्न समीकरण रूढ झालं. आता त्यांनी ‘ऑल द बेस्ट- २’ हे नवं नाटक रंगमंचावर आणलं आहे. हे नाटक आधीच्या ‘ऑल द बेस्ट’चा पुढचा भाग नसून पूर्णपणे स्वतंत्र आहे. फक्त मूळ ‘ऑल द बेस्ट’मधील पात्रांच्या अपंगत्वाची कल्पना यातही योजली आहे, इतकंच.

यात एकांकिका सादर करणारा तरुणांचा ग्रुप स्पर्धेसाठी नवी एकांकिका बसवण्याकरता म्हणून एकत्र जमतो. ग्रुपमध्ये लेखक दिलीप (मुका), दिग्दर्शक चंद्रकांत (बहिरा) आणि प्रमुख नट विजय (अंध) ‘विशेष’ क्षमतेचे आहेत. लेखक दिलीप हातवारे आणि हावभावांनी इतरांशी संवाद साधतो. त्यानुसार दिग्दर्शक चंदू इतरांना नाटक समजावतो. नट अंध दिलीपला रंगमंचीय व्यवहार समजावून देताना पावलांच्या हिशेबाने सांगितल्या जातात. असे पूर्णपणे परस्परावलंबी असलेले हे तिघे ग्रुपमध्ये नव्याने आलेल्या रूपावर फिदा होतात. रूपाला अर्थातच हे माहीत नसतं. एक-दोन सीरियल्समध्ये काम केलेला आणि तेवढय़ानेच डोक्यात हवा गेलेला राजन या ग्रुपमध्ये येतो आणि रूपाला आपल्या जाळ्यात ओढू पाहतो. अर्थातच या तिघांना ते आवडत नाही. पण राजनने एकांकिकेचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली असल्यानं त्याला हीरो करण्याशिवाय त्यांना गत्यंतरही नसतं. रूपाला सीरियलमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून तो तिला पटवू बघतो. त्याचे हे उद्योग आणि नस्ते नखरे ग्रुपमधल्यांना नाइलाजानं सहन करावे लागतात.
दिलीपला एकांकिका सुचलेली नसतानाही ते तालमीसाठी जमतात. प्रत्येकाचे स्वभाव, वागणं यांतून तालमीतच नित्याचे ‘ब्लेम गेम’ सुरू होतात. तशात या तिघांच्या ‘विशेषत्वा’तून निर्माण होणारे घोळ आणखीन वेगळे. हे सगळं निस्तरता निस्तरता स्पर्धेत प्रत्यक्षात एकांकिका सादर करायची वेळ येऊन ठेपते, तरीही दिलीपचं स्क्रिप्ट तयार झालेलं नसतं. मग आयत्या वेळी जे सुचेल ते सादर करायचं असं ठरतं. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा आधार घेत एकांकिकासदृश काहीएक आविष्कार सादर केला जातो. राजन त्यांची ही एकांकिका पाडण्यासाठी नाना क्लृप्त्या योजतो. परंतु त्या सगळ्या अडचणींवर मात करत एकांकिका सादर केली जाते. राजनचं मात्र हसं होतं. त्याचा डाव लक्षात आल्यावर सगळे मिळून तो हाणून पाडतात. असो.
‘ऑल द बेस्ट- २’चं वैशिष्टय़ म्हणजे यातल्या कलाकारांची प्रचंड सळसळती ऊर्जा, अभिनयातली लवचिक उत्स्फूर्तता, सहजता आणि कमालीचा समन्वय! देवेंद्र पेम यांनी हा सुनियंत्रित गोंधळ कौशल्याने हाताळला आहे. काही वेळा नाटक हाताबाहेर चाललंय असं वाटत असतानाच परिस्थितीवर काबू मिळवत ते पुन्हा मार्गस्थ होतं. सिच्युएशनल कॉमेडी स्वरूपाचं हे नाटक. यातल्या काही सिच्युएशन्स लेखकानं निर्माण केलेल्या, तर काही पात्रांच्या वर्तन-व्यवहारातून निर्माण झालेल्या. मात्र, या दोन्हींत विनोदाच्या सूक्ष्म जागा हुडकण्यात पेम यशस्वी झाले आहेत. रूढार्थानं या नाटकाला कथानक नाही. शारीरदृष्टय़ा ‘विशेष’ असलेले तीन तरुण मुलगी पटवण्याकरता करत असलेला आटापिटा- हाच काय तो क्षीण धागा. परंतु तोही असून नसल्यासारखाच. नाटक उभं राहतं ते आयत्या वेळी निर्माण होणाऱ्या सिच्युएशन्समधूनच. त्यातला मॅडनेस पेम यांनी अचूक टिपला आहे. स्क्रिप्टविना सादर करावयाची एकांकिका, ती आकारण्यासाठी कलाकारांनी ओतलेली जान, राजनच्या कृपेनं तीत येणाऱ्या अडचणी.. आणि त्यावर मात करण्याकरता त्या- त्या क्षणी सुचेल त्या तऱ्हेने काढलेले मार्ग.. असा सारा आयत्या वेळचा मामला. ‘नाटकातलं नाटक’ हा फॉर्म देवेंद्र पेम यांनी यात लीलया हाताळला आहे. कलाकारांकडून आपल्याला हवं ते काढून घेण्यात ते चांगलेच यशस्वी झाले आहेत. प्रदीप मुळ्ये यांच्या लवचिक सेटने यातली विविध नाटय़स्थळं समूर्त केली आहेत. अभिजीत पेंढारकरांच्या उसळत्या संगीतानं नाटकाचा जल्लोषी टेम्पो नेमकेपणानं उंचावला आहे. भूषण देसाई यांच्या प्रकाशयोजनेनं नाटकाची मागणी यथास्थित पूर्ण केली आहे.
कलाकारांची फुसांडत वाहणारी ऊर्जा हे या प्रयोगाचं सर्वात मोठं वैशिष्टय़! मयुरेश पेम यांनी (बहिरा) दिग्दर्शक चंदू साकारताना सर्वस्व पणाला लावलं आहे. अनेक मोक्याच्या विनोदी जागा त्यांनी धमाल काढल्या आहेत. (मुका) लेखक झालेल्या अभिजीत पवार यांचा मॅड कॉमेडीचा कमालीचा सेन्स अचंबित करणारा आहे. त्यांच्या एकेका प्रतापातून नाटक क्षणोक्षणी उसळत पुढं सरकतं आणि हास्याच्या फवाऱ्यांची सतत बरसात होत राहते. सन्नीभूषण मुणगेकर यांनीही (अंध) विजयची होणारी उपेक्षा संधी मिळेल तेव्हा मस्तपैकी झुगारून दिली आहे. आपलं टॅलेंट सिद्ध करण्याची कसलीही संधी त्यांनी वाया दवडलेली नाही. राजनचा फिल्मी छापाचा खलनायक सिद्धेश प्रभाकर यांनी त्यातल्या कृत्रिमतेसह साकारला आहे. खुशबू तावडे (रूपा), विनायक कदम (कथकली डान्सर व बाबा), अंकिता पनवेलकर (दीपा), आशीष जोशी (वर्कशॉप), वीर अहिर (बॅकस्टेज) आणि सुशांत बने (पटय़ा) यांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे.
एकुणात, कसल्याही ताणाविना चार घटका धम्माल मनोरंजन हवं असेल तर ‘ऑल द बेस्ट-२’ला पर्याय नाही.