रेश्मा राईकवार

गेल्या आठवडय़ात हॉलीवूडमध्ये वारे वाहिलेत ते बहुप्रतिष्ठित, बहुचर्चित अशा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाचे.. दरवर्षी ९ फेब्रुवारीला हॉलीवूडमध्ये भव्यदिव्य असा अ‍ॅकॅडमी पुरस्कार सोहळा होतो. या वर्षीच्या सोहळ्यात ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरण्याची क्षमता असलेल्यांची नामांकन यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे आठवडाभर या नामांकनात चमकलेल्या कलाकारांचीच चर्चा आहे. त्यातही सर्वाधिक चर्चा आहे ती यात सर्वाधिक नामांकनं मिळवणाऱ्या ‘जोकर’ चित्रपटाची.. ‘जोकर’ला विविध विभागांत ११ नामांकनं जाहीर झाली आहेत. या वर्षी ‘जोकर’, क्वेन्टिन टेरेन्टिनो दिग्दर्शित ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलीवूड’ आणि मार्टिन स्कोर्सेसी यांचा ‘द आयरिश मॅन’ या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांत सर्वाधिक नामांकनं मिळाली आहेत. मात्र बाकीच्या दोन चित्रपटांपेक्षा एक नामांकन जास्तीचं मिळवत ‘जोकर’ने आघाडी घेतली आहे. खरं तर या चित्रपटाने जगभरातून तिकीटबारीवर चांगली कमाई केली आहे, पण ऑस्कर पुरस्कारासाठी त्याला इतकी नामांकनं मिळतील, याची कल्पना बहुधा चित्रपटाच्या निर्मात्यांनीही केली नव्हती. त्यामुळे एकूणच नामांकनं जाहीर झाल्यावर सगळेच ‘जोकर’विषयी बोलत सुटले आहेत. टॉड फिलिप्सच्या ‘जोकर’ची लोकांना पहिल्यांदा ओळख झाली होती ती ‘बॅटमॅन’ चित्रपट मालिकेतील ‘डार्क नाईट’मधला खलनायक म्हणून.. एकाकी पडलेला आणि मानसिकदृष्टय़ा अस्थिर असलेला एक अपयशी विनोदी कलाकार आर्थर फ्लेकची ही कहाणी स्वतंत्र चित्रपट म्हणून लोकांसमोर आणायची हा खरं तर एक प्रयोगच होता. पण टोड फिलिप्सने हा प्रयोग पडद्यावर आणला आणि यात जोकरची भूमिका साकारलेल्या जोकिन फिनिक्सने आपल्या अभिनयाने हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. त्यामुळे एका अर्थी नकारात्मक छटा असलेली व्यक्तिरेखा असतानाही या चित्रपटाला सगळ्यांकडून पसंती मिळाली आहे. त्याचंच प्रतिबिंब ऑस्कर नामांकनातही उमटलं आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेता या मुख्य विभागांबरोबरच सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, साऊंड मिक्सिंग अशा वेगवेगळ्या विभागांत या चित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत. एकूणच ‘जोकर’ या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणार, अशी चर्चा हॉलीवूडमध्ये सुरू झाली आहे.

‘स्टार’डम नको..’

‘माव्‍‌र्हल’पटातील नताशा ऊर्फ ‘ब्लॅक विडो’ म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सनही सध्या चर्चेत आली आहे ती ऑस्कर पुरस्कार नामांकनामुळेच.. स्कार्लेटला या वेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि साहाय्यक अभिनेत्री अशा दोन विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. ‘मॅरेज स्टोरी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचं तर ‘जोजो रॅबिट’ चित्रपटातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिला नामांकनं मिळाली आहेत. एकाच वेळी दोन विभागांतील पुरस्कारांसाठी नामांकनं मिळण्याचा प्रकार तसा दुर्मीळ असतो. आणि हा योग स्कार्लेटच्या कारकीर्दीत जुळून आला असल्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. स्वत: स्कार्लेट यामुळे खूप आनंदी आहे, मात्र पुरस्कारांसाठी तिने आर्ट फिल्मच करायच्या अशा मर्यादा किंवा बंधनं कधीच घालून घेतली नव्हती. पण कारकीर्दीच्या सुरुवातीलाच काही चांगले धडे मिळाल्याचं ती सांगते. १९९५ साली तिने सीन कॉनेरी आणि लॉरेन्स फिशबर्न यांच्याबरोबर ‘जस्ट कॉज’ हा चित्रपट केला होता. त्या चित्रपटादरम्यानची आठवण तिने सांगितली. याचं चित्रीकरण सुरू असताना तिची आणि लॉरेन्स यांची गाठभेट झाली. तेव्हा त्यांनी तिला विचारलं की तुला अभिनेत्री बनायचं आहे की मूव्ही स्टार? खरं तर त्या वेळी त्यांच्या त्या प्रश्नावर आपला गोंधळ झाला होता, असं तिने सांगितलं. मी अभिनेत्री आणि मूव्ही स्टार दोन्ही बनू शकते, असाच विचार माझ्या मनात होता त्या वेळी.. त्यांना नेमकं मला काय विचारायचं होतं हे तेव्हा मला कळलं नव्हतं. हळूहळू मला ते समजलं. तुम्हाला जर उत्तम अभिनेत्री बनायचं असेल तर तुम्हाला आपल्या कलेवर खूप मेहनत घ्यायला हवी. जर तुम्हाला मूव्ही स्टार व्हायचं असेल तर.. या दोन गोष्टी खरंच वेगळ्या आहेत. हे नंतर समजलं, असं तिने मनमोकळपणाने एका कार्यक्रमादरम्यान कबूल केलं. स्कार्लेटने साकारलेल्या ब्लॅक विडोच्या भूमिकेचा माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये तरी अंत झाला आहे. त्यामुळे पुढच्या माव्‍‌र्हलपटात ती नसेल कदाचित.. पण ब्लॅक विडोची पूर्वकथा सांगणारा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यात मात्र स्कार्लेट पुन्हा एकदा ब्लॅक विडोच्या भूमिकेत तिच्या चाहत्यांसमोर येणार आहे.