सुट्टी आणि बालनाटय़ किंवा बालचित्रपट यांचं अतूट समीकरण पूर्वी पाहायला मिळायचं. त्या तुलनेत आता बालचित्रपटांची संख्या कमी झाली आहे. विशेषत: सुट्टीच्या काळात लहान मुलांना खास त्यांची कथा असलेले चित्रपट पाहायला मिळणं ही सध्या पर्वणी ठरते आहे. या पाश्र्वभूमीवर बाहेरगावहून मुंबईत येणाऱ्या एका खोडकर मुलाची अफलातून गोष्ट सांगणारा विजू माने दिग्दर्शित ‘मंकी बात’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात गायक-संगीतकार अवधूत गुप्ते अभिनेता म्हणून लोकांसमोर येणार असून सहा वेगवेगळ्या रूपात ते पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अवधूत गुप्ते आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी ‘लोकसत्ता’कडे चित्रपटामागची भूमिका विशद केली.

‘मंकी बात’ या चित्रपटात कृष्णासमान असलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत अवधूत गुप्ते दिसणार आहेत. ही व्यक्ती या चित्रपटातील खोडकर नायक आर्यनच्या मागे सतत मार्गदर्शक म्हणून वावरत असते. अभिनय हा खरं म्हणजे माझा व्यवसाय नाही त्यामुळे मला अनेकदा अभिनयासाठी विचारणा होऊनही मी त्या नाकारल्या होत्या. ‘मंकी बात’साठी विजू मानेंनीही विचारणा केली तेव्हा त्यांनाही मी नकारच दिला होता. मात्र या चित्रपटाची कथा आणि ती भूमिका ऐकल्यानंतर कुठेतरी ज्या लहान मुलांनी मला आजवर इतकं प्रेम दिलं आहे त्यांच्यासाठी का होईना हे काम करावंसं वाटलं. खरं म्हणजे चित्रपट म्हटल्यावर टिपिकल एखादा नायक साकारण्याची माझी हौस काही यात पूर्ण झालेली नाही, असं अवधूत गुप्ते गमतीने सांगतात. कृष्णाची किंवा देवाची भूमिका म्हणून ती जास्त आकर्षक वाटली का? यावर भूमिकाही भूमिका असते. ती देवाची आहे किंवा काय असा विचार मी केला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यातला जो मुलगा आहे आर्यन तो अतिशय खोडकर आहे. मुलं म्हटल्यावर ती खोडकर असतातच. त्यामुळे त्यांच्या खोडय़ांनी कितीही त्रास होत असला तरी त्या आपल्याला हव्याहव्याशा वाटतात. मात्र खटय़ाळपणा आणि दुसऱ्याला त्रासदायक ठरेल असा खोडकरपणा यातील सीमारेषा बऱ्याचदा धूसर असते. दुसऱ्याला जीवघेणा ठरेल असा प्रकार खोडय़ांच्या नावाखाली एखादा मुलगा करायला लागला तर त्याला लगाम घालावाच लागतो. अशा प्रसंगात तर देवही असेल तर तो गोंधळणारच.. आर्यनचा प्रवासही यात असाच दाखवला गेला आहे. त्याला लगाम घालण्याचं, त्याची चूक दाखवून देण्याचं काम मी या चित्रपटात माझ्या भूमिकेतून केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

अवधूत गुप्तेंनी चित्रपटात अभिनय केलेला नसला तरी त्यांनी दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवलेला आहे. एका दिग्दर्शकाने दुसऱ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात अभिनेता म्हणून काम करताना काही वाद होतात का?, असं विचारल्यावर अभिनेता म्हणून जेव्हा मी दुसऱ्या दिग्दर्शकाकडे काम करतो तेव्हा माझं दिग्दर्शकाचं डोकं बाहेर ठेवून येतो. मी अजिबात दिग्दर्शकाच्या कुठल्याही प्रक्रियेत सहभागी होत नाही. शेवटी तो त्या दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. त्यामुळे त्यातलं चांगलं असेल तर तेही दिग्दर्शकाचं आणि वाईट असेल तर तेही दिग्दर्शकाचंच.. हे स्वत: मी माझ्या चित्रपटांच्या बाबतीतही पाळतो, असं त्यांनी सांगितलं.