बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये तिने स्थान मिळवलं आहे. ‘पद्मावत’ या संजय लीला भन्साळींच्या चित्रपटानंतर दीपिकाने एक वेगळीच उंची गाठली आहे. विविध धाटणीच्या भूमिका साकारण्यास प्राधान्य देणाऱ्या दीपिकाच्या पदरात आता आणखी एक महत्त्वपूर्ण भूमिका पडली आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या एका गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दीपिका मुख्य भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार, एका दाक्षिणात्य निर्मात्याकडून साकारलेला श्रीदेवी यांच्या त्या चित्रपटाचं दिग्दर्शन बॉलिवूड दिग्दर्शकाने केलं होतं. आता हा चित्रपट नेमका कोणता आहे, याबाबत निर्मात्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं आहे. त्याच्या रिमेकबाबत दीपिकाशी बोलणी झाली असून तिने त्यात काम करण्याची इच्छादेखील व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : ‘आराध्या बच्चन भविष्यात देशाची पंतप्रधान होऊ शकते, पण..’

सध्या दीपिकाच्या हातात विशाल भारद्वाज यांचा माफिया क्वीनवर आधारित चित्रपट आहे. ज्यामध्ये ती इरफान खानसोबत भूमिका साकारणार आहे. मात्र कॅन्सरने ग्रस्त असलेला इरफान भारतात परतल्यानंतरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. आता दीपिका श्रीदेवी यांनी साकारलेली कोणती भूमिका पडद्यावर साकारणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.