|| भक्ती परब

काही महिन्यांपूर्वी एकता कपूरने एक ट्वीट केलं होतं त्यावरून चर्चेला सुरुवात झाली होती. तिच्या कुठल्यातरी एका मालिकेचं दुसरं पर्व घेऊन ती येणार असल्याचं यात म्हटलं होतं. काही महिन्यांची उत्सुकता आता संपली असून ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका ती करत असल्याचं जाहीर झालं असून मालिकेची भव्य-दिव्य प्रसिद्धी केली जात आहे. पण आपल्याच मालिकेचं दुसरं पर्व आणणाऱ्या एकता कपूरची अवस्था मात्र एखाद्या शाळकरी विद्यार्थिनीसारखी झाली आहे. एखादी परीक्षा देत आहोत असं तिला वाटतंय..

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेची २००१ मध्ये केलेली सुरुवात आठवते आहे. कुठली मालिका तुला पुन्हा करायची आहे? अशी विचारणा झाली तेव्हा ‘कसौटी जिंदगी की’ हे नाव पहिल्यांदा ओठावर आलं. ही एक अभिजात मालिका होती. या मालिकेतील व्यक्तिरेखा विचारपूर्वक घडवल्या गेल्या होत्या. ही मालिका प्रेमाविषयी एक वेगळा विचार देणारी होती. गेलं वर्षभर मी ‘कसौटी जिंदगी की’च्या सुरुवातीच्या दिवसांत बुडाले होते. मालिकेला प्रेक्षकांकडून आधी मिळाला तसा खूप चांगला प्रतिसाद आणि प्रेम मिळेल का? याची चिंता वाटतेय. ताण जाणवत असल्याचं एकताने सांगितलं.

मालिका लेखन करणाऱ्या लेखकांविषयी, तिच्या सर्जनशिल चमूविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ती म्हणाली, या मालिकेचं सर्व श्रेय लेखकांचं आहे. मालिकेत एक आपलेपणा असून आपल्या आतून काहीतरी तुटतं तेव्हा जी वेदना होते ना तसं वाटतंय. यातलं नाटय़, लग्नं हे सगळं प्रेक्षक विसरतील पण तो आपलेपणा विसरता येणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येते, जिच्यावर खूप प्रेम जडतं, पण काही परिस्थितीमुळे त्याचं प्रेम पूर्णत्वास जात नाही. काही नात्यांना नाव नसतं. पण तरीही ते नातं तुमच्यासोबत असतं, प्रत्येक क्षणी. ‘अनुराग’ आणि ‘प्रेरणा’ एकमेकांसाठी आहेत पण ते कधीच एकमेकांचे झाले नाहीत ही त्यांच्या प्रेमाची कसोटी आहे.

मालिकेतील मुख्य भूमिकांमध्ये एरिका फर्नाडिस आणि पार्थ समथानची हे कलाकार आहेत. त्यांची निवड कशी केलीस या प्रश्नावर एकताने सांगितले, एरिकाच्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे’ या मालिकेचे ‘प्रोमो’ पाहिले होते. त्यानंतर तिची निवड केली. ‘अनुराग’च्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेता निवडताना खूप वेळ गेला. खूप ‘ऑडिशन्स’ घेतल्या. एके दिवशी पार्थ समथानची काही छायाचित्रं आमच्या सर्जनशील चमूतील एकाने दाखवली. ती पाहिल्यानंतरच ठरवलं की हाच ‘अनुराग’ आहे. अनुराग ही अशी व्यक्तिरेखा आहे की तुम्ही त्याला भेटलात की कधीच विसरणार नाही. ‘अनुराग’ आणि ‘प्रेरणा’ या नावाभोवतीसुद्धा एक गोष्ट आहे. ‘अनुराग’ म्हणजे प्रेम हे व्यक्तिरेखेचं नाव पटकन ठरलं. पण मुलीच्या व्यक्तिरेखेचं नाव काही केल्या सापडत नव्हतं. माझे वडील जितेंद्र यांचे जवळचे मित्र प्रेम चोप्रा आहेत. त्यांच्या मुलीचं नाव प्रेरणा आहे. पहिल्यांदा हे नाव ऐकलं तेव्हा खूप आवडलं. ‘अनुराग’ म्हणजे प्रेम आणि आणि प्रेरणा देणारी प्रेरणा यांचं नातं म्हणजे ही मालिका असा विचार केला.

दूरचित्रवाणी या माध्यमाविषयी ती म्हणाली, इथे प्रत्येक सहा महिन्यांनंतर सगळी गणितं बदलतात. त्यामुळे एकच एक विचार घेऊ न तुम्ही काम करू शकत नाही.

यशस्वी कारकीर्दीचा विशेष मंत्र किंवा ठरावीक साचा वगैरे काही नाही. तुम्ही जे काम केलं आहे, ते तुम्हाला इतरांना दाखवून आणि लक्षात आणून देता आलं पाहिजे. मग त्यात यशस्वी व्हा किंवा अयशस्वी व्हा. इतरांना ते जाणवून देणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाकडेच चांगले गुण आहेत पण मेहनत घेऊन ध्येय गाठणाराच यशस्वी होतो. तुम्ही निवडलेलं ध्येय आयुष्यातील सगळ्या चढ-उतारांवर मात करण्याचं बळ देतं. आपण जे काम करतो, त्यावर आपलं प्रेम पाहिजे.

आजपर्यंत कधीही माझी मालिका कोणत्या वेळेत दाखवावी याविषयी वाहिन्यांशी चर्चा केली नाही. मला नेहमी ‘प्राइम टाइम’ नसलेली वेळ मिळाली. पण तरीही त्या सर्व मालिका गाजल्या. या वेळी पहिल्यांदा ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेसाठी ‘प्राइम टाइम’ची वेळ निवडली आहे.    – एकता कपूर