अभिनेता रितेश देशमुखची पत्नी व अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुखने करोनावर यशस्वी मात केली. गेल्या २१ दिवसांपासून जेनेलिया क्वारंटाइनमध्ये होती आणि २१ दिवसांनंतर शनिवारी तिच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तिला करोनाची लागण कशी झाली आणि क्वारंटाइनमध्ये तिने कशाप्रकारची काळजी घेतली याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत जेनेलियाने सांगितलं, “आम्ही लातूरला गेलो होतो. तिथल्या घरातील एका व्यक्तीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आम्हा सर्वांची करोना चाचणी करण्यात आली. मला अजिबात लक्षणे नव्हती आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल याची कल्पना मी स्वप्नातसुद्धा केली नव्हती. लातूरमध्ये चाचणी झाल्यानंतर आम्ही त्यादिवशी मुंबईला परत येणार होतो. परत येताना प्रवासातच मला समजलं की रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुदैवाने रितेश आणि मुलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर मी थेट लीलावती रुग्णालयात गेले. तिथे सर्व तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. मी आमच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.”

https://www.instagram.com/p/CEebYQSJI0J/

आणखी वाचा : ‘पांढरे ठिपके कुठंय?’ अनुष्काच्या ड्रेसवरून भन्नाट मीम्स व्हायरल

क्वारंटाइनमधील २१ दिवसांचा अनुभव सांगताना ती पुढे म्हणाली, “२१ दिवस क्वारंटाइनमध्ये राहणं आव्हानात्मक होतं. माझ्याच घरी वेगळ्या खोलीत क्वारंटाइन करून घ्यायला पाहिजे होतं. कारण पूर्णपणे एकटं राहणं खूप कठीण असतं. त्या कठीण परिस्थितीत मला मित्र-मैत्रिणी कॉल करायचे आणि मला सकारात्मक राहायला मदत करायचे. रितेशने मुलांची संपूर्ण काळजी घेतली होती. तो खूप चांगला पती आणि चांगला पिता आहे. १४ दिवसांनंतर माझी पुन्हा एकदा चाचणी झाली. पण पुन्हा तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मला आणखी एक आठवडा क्वारंटाइनमध्ये राहावं लागलं होतं. मी बाहेरून कोणतीच मदत घेतली नव्हती. स्वत: स्वयंपाक आणि साफसफाईचं काम करायचे.”

जेनेलियाने शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित करोनावर मात केल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.