जातिवाचक शिवीगाळ केली तर फौजदारी गुन्हा दाखल होतो तर स्त्री जातीला कमी लेखले, त्यांचा अपमान होईल, असे वक्तव्य कोणी केले तर फौजदारी गुन्हा का दाखल होऊ नये, असा सवाल प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी रविवारी वसई येथे केला.
जागरूक नागरिक संस्थेने न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या ‘सुविचार प्रसार मंच’ या उपक्रमाअंतर्गत कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. लेखिका वीणा गवाणकर अणि चित्रकार-संपादक मनोज आचार्य यांनी कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला.
कुटुंब व्यवस्था विकसित होताना स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेल्याचे सांगून कुलकर्णी म्हणाले की, आजही आपण सरकार किंवा अन्य कोणालाही ‘नामर्द’ किंवा ‘बांगडय़ा भरा’ असे म्हणतो तेव्हा स्त्री जातीचाच आपण अपमान करत असतो. त्यामुळे जातिवाचक शिवीगाळ केल्यानंतर दाखल होणाऱ्या फौजदारी गुन्ह्याप्रमाणे स्त्री जातीला कमी लेखले किंवा त्यांचा अपमान होईल, असे वक्तव्य केले तर फौजदारी गुन्हा का दाखल होऊ नये? असा सवालही त्यांनी केला.
शिकलेले लोक राजकारणात उतरायला घाबरतात. पण देश आहे, म्हणजे देशाला सरकार लागणारच आणि सरकार असणार म्हणजे ते चालवायला माणसे लागणार. मग जर चांगली माणसे निवडणुकीला उभी राहणारच नसतील तर मतदारांच्या हातात फक्त ‘वाईट’ आणि ‘आणखी वाईट’ असेच पर्याय राहतात. मग आजच्या राजकारण्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे, असा सवाल त्यांनी केला. आजच्या सर्व समस्यांचे मूळ चुकीच्या शिक्षण पद्धतीत आहे. त्यामुळे समाजसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांनी प्राथमिक शिक्षण क्षेत्रात काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. या मुलाखतीत कुलकर्णी यांचा सोलापूरमधील मध्यमवर्गीय घरातील सर्वसामान्या मुलगा ते राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या अभिनेत्यापर्यंतचा प्रवास उलगडला गेला. जागरूक नागरिक संस्थेचे सचिव चिन्मय गवाणकर यांनी प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष रुलेश रिबेलो यांनी आभार मानले.