रेश्मा राईकवार

कबीर सिंग

एखाद्या भाषेतला चित्रपट सुपरहिट ठरला की त्याचा जसाच्या तसा रिमेक करायचा हा ट्रेण्ड बॉलीवूडमध्ये रुळलाय. मात्र रिमेक करताना केवळ कथेतील संदर्भ आपल्या भाषेनुसार बदलले किंवा संवाद तसेच्या तसे हिंदीत अनुवाद केले म्हणजे चित्रपट होत नाही, याची जाणीवच निर्माता-दिग्दर्शकांमध्ये नाही की काय अशी शंका ‘कबीर सिंग’सारखा रिमेक पाहताना छळत असते. ती कथाच मुळात का सांगाविशी वाटते आहे? याचे उत्तर न शोधता केलेला हा चित्रपट म्हणजे आत्मा हरवलेला रिमेक एवढेच म्हणता येईल.

प्रचंड हुश्शार अगदी दारू पिऊनही व्यवस्थित सर्जरी करणारा डॉ. कबीर सिंग सारखा ऑर्थोपेडिक सर्जन. केस वाढवलेला, दाढीची खुंट वाढलेली असा विस्कटलेला चेहऱ्याचा असा हा सर्जन काम संपल्यावर स्वत:ला दारूत बुडवून घेतो. त्याच्याजवळ प्रीती नावाची कुत्री आहे, घरात काम करणारी बाई आणि जीवाला जीव लावणारा मित्र शिवा एवढाच त्याचा व्याप. विमनस्क स्थितीतील कबीरचे आत्ताचे आयुष्य दाखवता दाखवता चित्रपट त्याच्या भूतकाळात पोहोचतो. दिल्लीतील मेडिकल महाविद्यालयात शिकणारा कबीर (शाहीद कपूर) हा खेळ, अभ्यास सगळ्यात चॅम्पियन आहे. फक्त एकाच गोष्टीत तो मार खातो ते म्हणजे त्याला रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. एखाद्या गोष्टीमुळे राग आलाच तर त्याला कारणीभूत असणाऱ्याला बेदम मारून राग काढणारा कबीर महाविद्यालयात आलेल्या प्रीती (कियारा अडवाणी) नामक तरुणीला पाहताक्षणी प्रेमात पडतो. मुळात कबीरच्या या अनियंत्रित रागाचे निश्चित कारणच कळत नाही. एकाच क्षणी तो प्रचंड रागीट, उद्धट म्हणून समोर येतो, तर दुसऱ्या क्षणी अगदी प्रेमळ, समजुतीचे बोल बोलणारा कबीर यातले त्याचे खरे व्यक्तिमत्त्वच लक्षात येत नाही. हे नायकाच्याच बाबतीत आहे असेही नाही. तर त्याची नायिका अगदी शांत असलेली, त्याचे निमूट सगळे ऐकणारी, नाजूक व्यक्तिमत्त्वाची प्रीती प्रेमाच्या बाबतीत मात्र त्याच्याहीपेक्षा जिद्दी आहे. कबीरला नजरेसमोरून दूरही होऊ न देणारी प्रीती. दोन टोके वाटणारी ही व्यक्तिमत्त्व प्रेमात पडतात म्हणण्यापेक्षा प्रेमात आकंठ बुडतात. या प्रेमाच्या पाश्र्वभूमीवर मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगचे स्वरूपही प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रीतीला कोणीही रॅगिंग करू नये म्हणून पूर्ण कॉलेजला धमकी देणारा कबीर तिला रंग फासणाऱ्याला बेदम चोप देतो. मात्र त्याच क्षणी सावधपणे त्याच्याकडून तिला पुन्हा हात न लावण्याचे वचन घेतो. एकाच वेळी नियंत्रित असलेला मात्र सगळ्या गोष्टी आपल्याच पद्धतीने जगू पाहणारा, प्रसंगी ताळतंत्र सोडणारा कबीर त्याच्या याच स्वभावामुळे एका क्षणी प्रीतीला हरवून बसतो. आणि मग तो नशेच्या विळख्यात अडकत जातो, ही सर्वसामान्य कथा म्हणता येईल.

मात्र ही तशी साधी-सामान्य कथा तब्बल तीन तास प्रेक्षकांना पाहावी लागते. चित्रपटाची ही लांबी कंटाळवाणी आहे आणि ज्या पद्धतीने त्याचा शेवट झाला आहे तो तापदायक आहे. इतके तीन तास घोळवून काय सांगायचे होते? अ आणि ब भेटले, विलग झाले, पुढे ते पुन्हा भेटले? कथेच्या बाबतीत चित्रपटातून फारसे काही हाती लागत नाही. ‘अर्जुन रेड्डी’ या हिट चित्रपटाचा हा रिमेक आहे. आणि मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा यांनीच कबीर सिंगचे दिग्दर्शन केले आहे, अर्थात हिंदी करताना त्यात काही बदल केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी अगदी प्रत्येक फ्रेम मूळ चित्रपटासारखीच आहे. मात्र तरीही त्या चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटाचा प्रभाव शून्य आहे. अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर शाहीद कपूरचा कबीर आता वेगळा वाटतच नाही, इतकी त्याला अशा भूमिकेत पाहण्याची सवय झाली आहे. त्याची व्यक्तिरेखा ही थोडीफार ‘उडता पंजाब’मधील त्याच्या व्यक्तिरेखेच्या जवळ जाणारी आहे. त्यात काही वेगळेपणा नाही. स्वत:ला उद्ध्वस्तच करू पाहणारी अशी ही व्यक्तिरेखा आजी गेल्यानंतर इतर कुठलेही खास प्रयत्न न घेता कशी सुधारते हेही न सुटलेले कोडे आहे. सतत कोणाच्या तरी अंगावर ओरडणे, एका ठरावीक चौकटीतून समोरच्याकडे पाहणारी, त्याच्याकडून तशीच अपेक्षा ठेवणारी व्यक्तिरेखा प्रत्यक्षात नाहीच असे म्हणता येत नाही. मात्र त्याच्या वागण्याचे समर्थनही करता येत नाही. इथे सातत्याने तो प्रयत्न होतो. कबीरची हुशारी, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची निष्ठा, समजून घेणे एकीकडे आणि प्रेमात ये अपनी बंदी है.. वाली आक्रमकता असा सगळाच गोंधळ आहे. त्यातल्या त्यात या दोघांमध्ये फुलणारे सहजप्रेम सुंदर पद्धतीने येते. मात्र त्यातील गाणी अजिबातच लक्षात राहणारी नाहीत. कबीरच्या व्यक्तिरेखेची समस्या मुळात इथे संवादातूनही खुलवता आलेली नाही. तो जे वागतो ते योग्य नाही हे जाणवणारे अनेक जण आहेत. अगदी त्याच्याच ग्रुपमधील मुलीही आहेत पण शांत बसण्याखेरीज त्या काही करताना दिसत नाहीत. तुलनेत कियाराच्या वाटय़ाला आलेली प्रीतीची भूमिका सुरुवातीला बाहुलीसारखी वाटली तरी शेवटाला तिचा काहीएक पवित्रा, विचार आणि त्यानुसार वर्तन करताना दिसते. पण त्यामुळे कथेत काही फार प्रभाव पडत नाही. कथा, अभिनय, गाणी कशातले कोहीच समजू न देणारा असा हा निर्थक तीन तासांचा चित्रप्रवास आहे.

दिग्दर्शक – संदीप वांगा

कलाकार – शाहीद कपूर, कियारा अडवाणी, अर्जन बाज्वा, कामिनी कौशल, सुरेश ओबेरॉय, आदिल हुसैन, सोहम मजुमदार, अमित शर्मा.