21 November 2017

News Flash

चित्ररंग : निखळ करमणुकीचा डोस

स्वच्छता आणि पाणी वाचवणे या दोन गोष्टी तो कटाक्षाने पाळतो.

रेश्मा राईकवार | Updated: May 20, 2017 2:52 AM

‘चि. व चि. सौ. कां.’

मुलगा-मुलीला भेटतो आणि ते पहिल्याच भेटीत प्रेमात पडतात. मग त्यांचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचते. त्यानंतर मग प्रेमातील नवलाई निघून गेली की वादविवाद सुरू होतात. संवाद हरवतो. अशा वेळी दोघांपैकी कोणा एकाने सावरलेच किंवा त्यांच्यातील दुरावा मिटवून दुवा सांधणारे कोणी भेटले तर ‘पुढे ते गुण्यागोविंदाने नांदू लागले’ अशी सुखांतिका घडते. नाही तर शोकांतिका अटळ असते. ‘चि. व चि. सौ. कां.’ चित्रपटातील नायक-नायिके ची गोष्ट सुखांतिके च्याच अंगाने जाणारी आहे, पण प्रेमाचे निकष थोडे बदललेले आहेत. कारण आजचे प्रेमी नायक-नायिका आजूबाजूला घडणाऱ्या आपल्याच मित्र-मैत्रिणींच्या लग्नाच्या गोष्टी अनुभवून सज्ञान झालेले असतात. त्यांच्यापुढे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखा पर्यायही आहे. तर हे दोघेही सजग आहेत, त्यामुळे ‘श्री. व सौ.’ होण्यासाठी आपण लायक आहोत का, यासाठी ते जो प्रयोग करतात त्याची ही निखळ करमणूक करणारी गोष्ट आहे. इथे मुख्य प्रयोगापेक्षा तो रंगवण्यासाठी ज्या घटक व्यक्तिरेखा वापरल्या आहेत त्यांनी चित्रपटात जास्त रंग भरले आहेत, हे विशेषत्वाने नमूद करायला हवे.

‘चि. व चि. सौ. कां.’ या चित्रपटाचा नायक सत्यप्रकाश (ललित प्रभाकर) हा सौरप्रकल्पाचा प्रणेता आहे. सौरउत्पादने बनवणारी त्याची फॅक्टरी आहे. तो टोकाचा पर्यावरणवादी आहे. स्वच्छता आणि पाणी वाचवणे या दोन गोष्टी तो कटाक्षाने पाळतो. तर नायिका सावित्री (मृण्मयी गोडबोले) हिची कथा अगदीच टोकाची आहे. सावित्री प्राण्यांची डॉक्टर आहे. तिचे प्राणिप्रेम इतके मोठे आहे की रिक्षात बसतानाही त्या रिक्षाचालकाला शाकाहारी की मांसाहारी? असा पहिला प्रश्न विचारते. हे दोघेही आपापल्या मित्रमैत्रिणीच्या लग्नात पहिल्यांदा भेटतात आणि तरीही ते पहिल्याच भेटीत प्रेमात पडत नाहीत. योगायोगाने सावित्रीच्या घरी सत्यप्रकाशचे स्थळ सांगून येते आणि मग रीतसर कांदेपोहे कार्यक्रमाच्या निमित्ताने ते एकत्र भेटतात. इथे मात्र सावित्री लग्न करण्याअगोदर आपल्याला सत्याबरोबर काही दिवस एकत्र राहून पाहायचे आहे, अशी अट घालते. आत्ताच्या मुला-मुलींसमोर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्याय उपलब्ध आहे. तरीही सावी इथे सत्याबरोबर ‘अशारीर’ नाते असेल, अशी हमी घरच्यांना देऊन या प्रयोगासाठी सत्याच्या घरात दाखल होते. इथून पुढे ही सत्या-सावीची कथा प्रेमकथेच्या त्याच वळणावरून पुढे जाते. फक्त त्यात या दोघांच्या विरुद्ध स्वभावामुळे एकत्र राहताना घडणाऱ्या गमतीजमती प्रेक्षकांना हसवतात.

या चित्रपटात सत्या-सावीच्या घरचे लोक या दोघांपेक्षाही वरचढ ठरले आहेत. ‘आजी’ या शब्दाला लाजवेल अशी उत्साही आणि आधुनिक विचारांची सत्याची आजी (ज्योती सुभाष), सतत प्रत्येक गोष्ट मोबाइलमध्ये चित्रित करून ठेवणारे त्याचे आई-वडील एकीकडे तर सावीच्या घरी त्यामानाने साधी-सरळ राहणी असलेले तिचे आई-बाबा, तिची गर्भवती असलेली मोठी बहीण आणि छोटा अवलिया भाऊ टिल्या या व्यक्तिरेखांच्या एकत्र येण्यातून एकच धम्माल उडते. या दोन्ही कुटुंबांमधील संबंध त्यांच्या तऱ्हेवाईकपणासह दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी खूप छान रंगवले आहेत. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले दोघांनीही आपल्या व्यक्तिरेखांना पूर्ण न्याय दिला असला तरी जोडी म्हणून त्यांचे प्रेम पडद्यावर फुलण्यासाठी दिग्दर्शकाने फार वेळ दिलेला नाही. चित्रपटाचा शेवटही त्यामुळे फारसा प्रभावी ठरत नाही. सुरुवातीचा काही भाग सोडला तर या चित्रपटातील सगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतात. त्यांच्यातले खटकेबाज संवाद, गमतीशीर प्रसंग यामुळे हा चित्रपट निखळ मनोरंजन करतो. या चित्रपटातील ज्योती सुभाष यांची आजी तर न विसरता येणारी आहे. याशिवाय, सुप्रिया पाठारे-प्रदीप जोशी आणि पूर्णिमा तळवलकर-सुनिल अभ्यंकर या चौकडीनेही धम्माल केली आहे. पुष्कर लोणारकरचा टिल्ल्या भाव खाऊन जातो. तसाच भारत गणेशपुरेंचा देव ब्रrोही रंगत आणतो. या सगळ्या कलाकारांची भट्टी दिग्दर्शकाने इतकी फर्मास जमवली आहे की निखळ मनोरंजनाचा डोस तुम्हाला चांगलाच लागू पडतो. पण ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ यातली परेश मोकाशी यांची चपखल मात्रा इथे लागू पडलेली नाही, हेही जाता जाता सांगायलाच हवे.

चित्रपट : चि. व चि. सौ. कां.

  • दिग्दर्शक – परेश मोकाशी
  • कलाकार – ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, ज्योती सुभाष, सतीश आळेकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, सुनील अभ्यंकर, पूर्णिमा तळवलकर, पुष्कर लोणारकर, ऋ तुराज शिंदे, आरती मोरे, शर्मिष्ठा राऊत.

First Published on May 20, 2017 2:52 am

Web Title: loksatta review on marathi movie chi ani chi sau ka