महेश भट्ट हे बॉलिवूडमधील डॉन आहेत. त्यांच्या एका फोनमुळे एखाद्या कलाकाराचं आयुष्य उद्धस्त होऊ शकतं, असा खळबळजनक आरोप लविना लोध हिने केला होता. लविना ही महेश भट्ट यांची सुन आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिने महेश भट्ट यांच्यावर आरोप करताना अभिनेत्री अमायरा दस्तूर हिच्यावर देखील निशाणा साधला होता. दरम्यान लविनाच्या या आरोपांवर आता अमायराने प्रत्युत्तर दिलं आहे. ती लविनाविरोधात मानहानिचा दावा ठोकणार आहे.

अमायराच्या वकिल सवीना बेदी यांनी लविनाने केलेला आरोप फेटाळून लावले आहेत. अमायराला बदनाम करण्यासाठी असे खोटे आरोप केले जात असल्याचं त्या म्हणाल्या. जर लविनाने त्वरित जाहिर माफी मागितली नाही तर तिच्या विरोधात मानहानिचा दावा ठोकला जाईल, असाही इशारा आमायराच्या वकिलांनी दिला आहे.

यापूर्वी काय म्हणाली होती लविना लोध?

“माझं नाव लविना लोध असून हा व्हिडीओ मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी करत आहे. माझं लग्न महेश भट्टच्या भाच्यासोबत सुमित सभरवालसोबत झालं असून मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सुमित ड्रग्स सप्लाय करतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आहेत. यात अमायरा दस्तूर आणि अशा अनेक अभिनेत्रींचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत आणि हे फोटो तो दिग्दर्शकांना दाखवतो. तो कलाविश्वात मुली सप्लाय करतो.या सगळ्याची कल्पना महेश भट्टला आहे. महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, अशा आशयाचे आरोप लविनाने केले होते.