बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिच्या आगामी ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटाचा पहिला नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याचं कंगनाने सांगितलं आहे.

मणिकर्णिका हा चित्रपट झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असून यात कंगनाने राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कंगनाच्या चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगनाच्या टीमने ट्विटरवर कंगनाचा या चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. याच कंगनाने लाल रंगाची साडी नेसली असून भरपूर दागिने घातले आहेत. त्याचबरोबर तिच्यामागे श्रीगणेशाची मुर्तीदेखील दिसून येत आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये टीझरच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आली आहे.

झी स्टुडिओची प्रमुख निर्मिती असलेला हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील ब्राह्मण समुहाने ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप या चित्रपटावर केला होता, त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता.