शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शुभेच्छा दिल्यात पण या शुभेच्छा देताना सेनेचा उल्लेख जाणिवपूर्वक टाळला आहे. ‘मनसे नेते अभिजित पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटला मनसे शुभेच्छा’ असं लिहित महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छांचे पोस्टरही मनसेतर्फे दादर- शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र या पोस्टरमध्ये कुठेही’ ठाकरे’ चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी ‘ठाकरे’ची निर्मिती केली आहे तर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ‘ठाकरे’चं दिग्दर्शन केलं आहे. मात्र मनसेने शुभेच्छा देताना जाणीवपूर्वक शिवसेनेचा उल्लेख टाळला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

 

२०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असाही चर्चा दबक्या आवजात होत्या. या चर्चांवरही संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनेच्या फायद्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली नाही. ज्यांना यात राजकीय फायदा आहे असं वाटतं त्यांनी निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलाव्या असा टोलाही ‘ठाकरे’च्या प्रमोशनदरम्यान राऊत यांनी लगावला.

२५ जानेवारीला हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींसाठी खास स्क्रीनिंगही ठेवण्यात येणार आहे अशी माहितीही राऊत यांनी दिली. या स्क्रीनिंगसाठी भाजप आणि सेनेचे खासदारही उपस्थित राहणार आहे.