काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून सादर झालेल्या ‘मोगली’ मालिकेतील ‘जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पहेनके फूल खिला है फूल खिला है’ हे गाणे/शीर्षक गीत लहान मुले आणि मोठय़ांमध्येही खूप लोकप्रिय झाले होते. जंगलामध्ये प्राण्यांबरोबर राहणारा हा ‘मोगली’ मुलांचा ‘हिरो’ झाला होता. आता हा मोगली रुपेरी पडद्यावर लवकरच झळकणार आहे. ‘द जंगल बुक’ हा अॅनिमेटेड चित्रपट प्रदर्शित होत असून यास हिंदीमध्येही डब करण्यात येणार आहे.
हिंदीतील ‘द जंगल बुक’ या चित्रपटाला नाना पाटेकर, ओम पुरी, इरफान खान, प्रियांका चोप्रा हे कलाकार आवाज देणार आहेत. दूरदर्शनवरील ‘मोगली’ या मालिकेतील ‘शेर खान’ या पात्राला नाना पाटेकर यांनी आवाज दिला होता. आता पुन्हा एकदा नाना ‘शेर खान’साठी (वाघ) आवाज देणार असून, ओम पुरी हे मोगलीचा जीवलग मित्र ‘बगिरा’ (चित्ता) या पात्राला आवाज देतील. प्रियांका चोप्रा ही ‘का’ (अजगर) या पात्राला तर इरफान खान ‘बल्लू’ (अस्वल) या पात्राला आवाज देणार आहे. अभिनेत्री शेफाली ही ‘रक्षा’ (लांडगा) या पात्राला आवाज देईल. ‘द जंगल बुक’ हा चित्रपट भारतात ८ एप्रिलला प्रदर्शित होईल.
बिल मुरे, बेन किंग्सले, इदरिस एल्बा, ल्युपिटा न्योंगओ, स्कार्लेट जॉन्सन, क्रिस्तोफर वॉकेन आणि जियानकार्लो स्पोसितो यांनी इंग्रजीतील ‘द जंगल बुक’ला आवाज दिले आहेत.