४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला लवकरच गोव्यात सुरूवात होणार आहे. यावरून सध्या मोठा वाद रंगला आहे. दिग्दर्शक रवी जाधवचा ‘न्यू़ड’ हा चित्रपट महोत्सवातून वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. महोत्सवाच्या परीक्षकांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीकडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. इतर मराठी चित्रपटही या महोत्सवातून माघार घेतील, अशीही माहिती समोर आली. त्यानंतर आता या संपूर्ण वादावर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘न्यूड’ हा चित्रपट अपूर्ण असल्यामुळेच महोत्सवातून वगळल्याचं पर्रिकरांनी स्पष्ट केलं.

”न्यूड’ हा चित्रपट अपूर्ण असल्याची माहिती मला मिळाली. महोत्सवाच्या परीक्षकांनी जरी त्याची निवड केली असली तरी जर एखादा चित्रपट पूर्ण तयार नसेल आणि त्याला सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळालं नसेल तर तो इफ्फीमध्ये प्रदर्शित करता येणार नाही,’ असे पर्रिकर म्हणाले. पर्रिकर हे गोव्याच्या एण्टरटेन्मेंट सोसायटीचे अध्यक्ष आहेत आणि ही सोसायटी इफ्फीची सहआयोजक आहे.

वाचा : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

‘न्यूड’सोबतच मल्याळम चित्रपट ‘एस दुर्गा’सुद्धा महोत्सवातून वगळण्यात आलेला. या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य असल्याने आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून तो वगळला, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात ते पुढे म्हणाले की, ‘मामी आणि केरळ चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवला गेला. मात्र, आक्षेपार्ह दृश्यांना कात्री लावल्यानंतरच हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते. दरम्यान, ‘न्यूड’ हा चित्रपट ‘इफ्फी’तून वगळण्यात आल्याच्या विरोधात मराठी सिनेनिर्माते आता एकवटले आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी निर्मात्यांनी या महोत्सवावर बहिष्कार टाकण्याची तयारी केली आहे.