महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पूर्वार्धानंतर आता या चित्रपटाचा उत्तरार्ध येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. पुलंचं साहित्य, नाटकातलं योगदान ते उतारवयातील पुलं असा प्रवास उत्तरार्धात पाहायला मिळणार आहे. पुलंच्या पुस्तकांच्या माध्यमातून आता तुम्हालाही चित्रपटाच्या प्रिमियरपर्यंत पोहोचायला मिळणार आहे.

पुलंच्या पुस्तकांसोबतचा फोटो पाठवून सोशल मीडियावर #पुस्तकआणिपुलं या हॅशटॅगसह पाठवल्यास तुम्हालाही प्रिमियरमध्ये सहभागी होता येणार आहे. ३ भाग्यवान विजेत्यांना ‘भाई : व्यक्ती की’ कलाकारांसोबत प्रिमियरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर पोस्ट टाकताना पुलंचे ते पुस्तक तुम्हाला का आवडलं हे लिहित @Viacom18marathi ला टॅग करायला विसरू नका.

‘भाई : व्यक्ती की वल्ली’च्या उत्तरार्धात सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. पुलंचा चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये शंभर टक्के प्रवेश कसा झाला, आणिबाणीच्या काळातील पुलंनी घेतलेल्या भूमिका, बाबा आमटेंच्या ‘आनंदवन’साठी केलेली मदत अशा अनेक घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा उत्तरार्ध ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.