काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दिल्लीतील मालवीय नगर येथे असलेल्या ‘बाबा का ढाबा’चा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती व्यवसाय होत नसल्यामुळे रडताना दिसत होता. दरम्यान अभिनेत्री रवीना टंडनने त्यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांना मदत करण्यासाठी विनंती केली होती. आता रवीवाने आणखी एका आजींचा व्हिडीओ शेअर करत मदत करण्याचे आवाहन केले आहे.

रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एका आजींचा व्हिडीओ रिट्विट केला आहे. या व्हिडीओमधील आजी गेल्या ३० वर्षांपासून भजी बनवून विकत आहेत. त्यांची मदत करण्यासाठी रवीनाने लोकांना आवाहन केले आहे.

रवीनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक आजी रस्त्याच्या शेजारी बसून भजी बनवत असल्याचे दिसत आहे. त्या गेल्या ३० वर्षांपासून तेथे भजी विकत आहे. या आजी आसाममधील डुबरी येथील संतोषी मातेच्या मंदिराच्या बाहेर भजी बनवून विकण्याचे काम करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रवीनाने ‘कृपया त्यांना थोडी मदत करा’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. तसेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. आता लवकरच रवीना केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.