निलेश अडसूळ

करोनाकाळात कला क्षेत्राने अनुभवलेले नुकसान भयावह होते. निर्मात्यांची अवस्था बिकट होतीच, शिवाय कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांवर अधिकच अवकळा कोसळली होती. सरकारच्या पाठपुराव्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम जाहीर करून जून महिन्यात सरकारने चित्रीकरणाला हिरवा कंदील दाखवला आणि कलावंतांना मोठा दिलासा मिळाला. नियमांचे काटेकोरपणे पालन करून मालिका आणि चित्रपट क्षेत्र सुरू झाले. मध्यंतरीच्या काळात काही ठिकाणी या नियमांमध्ये हलगर्जी होत असल्याचेही बोलले जात होते, पण ते क्वचितच. नवा जन्म घेऊन सुरू झालेले हे क्षेत्र अविरत राहण्यासाठी प्रत्येक जण सध्या कसोशीने प्रयत्न करतो आहे. पण पुन्हा एकदा करोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असताना सुरक्षेचे कडे अधिक घट्ट करण्याची गरज आता मालिका-वेबमालिका आणि चित्रपटांच्या सेटवर भासू लागली आहे. करोनासंदर्भातील नियम पाळून चित्रीकरण करण्याची सवय आता कुठे अंगी बाणते आहे तोवर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याच्या बातम्या धडकू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी या नियमांना उजाळा देणारे आणि त्यात काही सुधारणा करत नव्याने नियमांची जाणीव करून देणारे पत्रक ‘अखिल भारतीय चित्रपट महामंडळा’ने जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने चित्रीकरण विभागात पुन्हा काय हालचाली सुरू झाल्या आहेत, निर्माते-दिग्दर्शक नव्याने काय काळजी घेणार, या सगळ्याचा तज्ज्ञांशी बोलून घेतलेला हा मागोवा..

‘कठोर नियम’

सुरुवातीला अत्यंत शिस्त बाळगून चित्रीकरणाचे काम सुरू होते. मध्यंतरी मात्र त्याकडे लोकांनी काणाडोळा करायला सुरुवात केली होती. सेटवर कलाकार- तंत्रज्ञांची काळजी घेतली जात होती, पण माणसांची गर्दी, उशिरापर्यंत चित्रीकरण असे प्रकार घडू लागले होते. या प्रकारांची दखल घेऊन काही ठिकाणी पोलीस प्रशासनाने परवानगी देणेही बंद केले. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करताना अडचणी येऊ लागल्या. आपणच मोठाले ताफे घेऊन दाखल झालो तर पोलीस यंत्रणेवर ताण येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आता ही नियमांची चौकट पुन्हा एकदा बळकट करण्याची वेळ आली आहे. उद्या आपल्यामुळे काही अनुचित घडले तर त्याचे परिणाम संपूर्ण क्षेत्राला भोगावे लागतील, याचा विचार सर्वांनीच करायला हवा. करोनाचे प्रमाण वाढत असल्याने नियमांच्या बाबतीत पुन्हा एकदा कठोरता आपणच आपल्या अंगी बाणली पाहिजे. सरकारला सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. त्यातही सध्या राज्यामध्ये एक नियम लागू असला तरी जिल्हानिहाय नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे सहकार्य आणि सामंजस्य ठेवून चित्रीकरण करायला हवे.

-मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

‘कारवाई होणार’

जून-जुलैदरम्यान चित्रीकरणाला गती मिळाली. सुरुवातीच्या काळात सगळ्यांच्याच मनात करोनाची भीती होती. त्यामुळे अगदी खानपानापासून ते प्रतिबंधात्मक उपायांमध्ये सर्वतोपरी काटेकोरपणा पाळला जात होता. आताही बहुतांशी निर्माते आणि कलाकार याबाबत आग्रही आहेत, पण काही लोकांकडून याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. अनेकांनी कलाकार आणि तंत्रज्ञांचा आरोग्य विमाही काढला नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि आरोग्य सेवेची कमतरता दिसून येते आहे. चित्रीकरणातील उपस्थितांची संख्याही नकळत वाढवली गेली. त्यामुळे परिस्थिती सुधारते आहे म्हणून आलेल्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी पुन्हा नियमांची उजळणी होणे गरजेचे आहे. कारण रुग्णांचे प्रमाण वाढणे ही आपल्यासाठी धोक्याची सूचना आहे. त्यामुळे सर्व निर्बंध कडक करण्याकडे आमचा कल असेल. फेडरेशनचे अधिकारी उद्यापासून स्वत: चित्रीकरण स्थळी भेट देऊन कुठे नियम मोडल्याचे आढळल्यास कारवाई करतील. वाढलेल्या करोनाशी लढण्यासाठी आपल्याला काळजी घेऊनच काम केले पाहिजे.

-बी. एन. तिवारी, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज

‘जबाबदारीने वागण्याची वेळ’

मालिका क्षेत्रात नियम जाहीर केल्यापासून ते आजपर्यंत सर्व नियम काळजीपूर्वक पाळले जात आहेत. सेटवर ३३ टक्के  उपस्थिती, निर्जंतुकीकरण, प्राथमिक तपासणी यात तसूभरही सूट दिलेली नाही किंवा खंड पडलेला नाही. संपूर्ण वाहिनी क्षेत्र याबाबत जागृत आहे. प्रत्येक चित्रीकरण स्थळी भेट देण्यासाठी वाहिन्यांनी स्वत:चे अधिकारी नेमले आहेत. निर्माते आणि वाहिनी या दोन्ही बाजूने ती काटेकोरता राखली जाते आहे, म्हणूनच काम अविरत आणि निर्विघ्न सुरू आहे. आजतागायत कुठेही कुणाला धोका पोहोचलेला नाही. काळजी घेणे गरजेचे आहेच, पण हलगर्जीपणा मात्र कुठेही झालेला नाही. एकूण क्षेत्रात २० हून अधिक बाधितांची संख्या नाही. प्रत्येक निर्मात्यांनी कर्मचाऱ्यांचा विमा काढला आहे. माझ्या स्वत:च्या संस्थेतील ४४७ कलाकार- तंत्रज्ञांचा आरोग्य विमा काढण्यात आला आहे. त्यामुळे घाबरून जाण्यापेक्षा जबाबदारीने वागण्याची ही वेळ आहे.

-नितीन वैद्य, निर्माते, दशमी क्रिएशन

‘टाळेबंदी परवडणारी नाही ’

निर्बंध लागू केल्यापासून चित्रीकरण युनिटमध्ये वाढ झालेली नाही. शिवाय प्रत्येक आठवड्यात डॉक्टरांची भेट, नियमित तपासणी, दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण यात आजवर कधीही खंड पडलेला नाही. बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चित्रीकरण स्थळी प्रवेश दिला जात नाही. अगदीच काही तातडीचे असेल तर येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण तपासणी होऊनच तो आत येतो. नियम पाळले पाहिजेत याची आठवण का करावी लागते? ते पाळले तरच ही प्रक्रिया अविरत सुरू राहील हे लक्षात घेतलं पाहिजे. लोकांना याची जाणीव करून द्यावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे येत्या काळात प्रत्येकाने नियमांचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. ही स्वत:ची जबाबदारी म्हणून आपण स्वीकारायला हवी. पुन्हा टाळेबंदी लागू झाली तर ते कलाकारांनाच नाही तर कोणत्याही क्षेत्राला परवडणारे नाही.

-अजय मयेकर, दिग्दर्शक