‘बाहुबलीः द कनक्ल्युजन’चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी सिनेमातली कटप्पाची तलवार निर्माता करण जोहरला भेट दिली आहे. हिंदी भाषेतील या सिनेमाचा करण निर्माता आहे, त्यामुळे या सिनेमाची एक आठवण म्हणून राजामौली यांनी करणला ही तलवार भेट दिली. राजामौली यांनी गुरुवारी मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये ‘बाहुबली २’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला. यावेळीच राजामौली यांनी कटप्पाची ती तलवार करणला भेट म्हणून दिली. सिनेमात या तलवारीचा उपयोग बाहुबलीला मारण्यासाठी केलेला दाखवण्यात आला आहे.
‘बाहुबली: द कनक्ल्युजन’च्या ट्रेलर प्रदर्शनावेळी सिनेमाचे निर्माते शोभू यर्लांगड्डा, दिग्दर्शक एस.एस राजामौली, अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबत्ती उपस्थित होते. यावेळी राणाने सिनेमाशी निगडीत अनेक रंजक गोष्टींचा खुलासा केला. २८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबत्ती आणि तमन्ना भाटिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. बाहुबली हा सिनेमा तेलगु, तामिळ, मल्याळम आणि हिंदी या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
करण जोहर हा सिनेमा हिंदीमध्ये प्रदर्शित करणार आहे. यासाठी धर्मा प्रोजक्शनने तब्बल १२० कोटींमध्ये या सिनेमाचे हक्क खरेदी केले आहेत. २०१७ मधील बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणून बाहुबलीकडे पाहिले जाते. ‘बाहुबली २’चा ट्रेलर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील ३०० हून अधिक चित्रपटगृहात दाखवण्यात आला होता. पण अधिकृतरित्या हा ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या काही तासांपूर्वी तामिळ भाषेतील ट्रेलर आधीच ऑनलाइन लीक झाल्यामुळे निर्मात्यांना हा ट्रेलर नियोजीत वेळेपूर्वी प्रदर्शित करावा लागला होता.
दरम्यान, ‘बाहुबली २’ च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. २४ तासांच्या आत हा ट्रेलर १ कोटींपेक्षाही अधिक लोकांनी पाहिला. ट्रेलरला ज्या पद्धतीने चांगला प्रतिसाद मिळत आहे तसाच प्रतिसाद सिनेमालाही मिळेल अशी अपेक्षा बाहुबली टीम सध्या करत आहे.