छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. पण सध्या लॉकडाउनमुळे मालिकेचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आल्यामुळे जुने भाग पुन्हा दाखवण्यात येत आहेत. अशातच या मालिकेने आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णावर देखील जादू केली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एका मुलाची पोस्ट शेअर केली आहे. त्या मुलाने पोस्टमध्ये त्याचे वडिल गेल्या सहा दिवसांपासून ब्रेन स्ट्रोकमुळे आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे सांगितले आहे. त्याच्या वडिलांनी आयसीयूमध्ये असताना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लावण्यास सांगितली. टीव्हीवर जेठालाल आणि बबिता दिसताच त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हासू आले असल्याचे त्याने म्हटले आहे.

दरम्यान या मुलाने त्याच्या वडिलांचा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका पाहतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. ती पाहून मालिकेचे निर्माते असित यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ती शेअर केली आहे. मालिकेला मिळत असलेले प्रेम पाहून त्यांनी त्या चाहत्याचे आभार मानले आहे.