मुंबई : परीक्षेचा महिना, अभ्यासात बुडालेले विद्यार्थी आणि त्यांच्या मागे ओरडून दमलेले पालक यामुळे चित्रपटाकडे पाहायची सवड कोणाला असणार? बहुधा याच गोष्टी लक्षात घेऊन हा महिनाभर फार मोठे चित्रपट प्रदर्शित न करण्याची खबरदारी चित्रपट निर्मात्यांनी घेतलेली दिसते. त्यामुळे हिंदीत तीन चित्रपटांची एकच गर्दी झाली आहे. राजकुमार रावचा ‘ट्रॅप्ड’ हा थरारपट, अब्बास-मस्तान यांची निर्मिती असलेला ‘मशीन’ आणि गोविंदाचे पुनरागमन असेलला ‘आ गया हिरो’ असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या तिघांतून काही निवडावेसे नाही वाटले तर एम्मा वॅटनसची मुख्य भूमिका असलेला ‘ब्युटी अँड द बीस्ट’ हा हॉलीवूडपट वेगळा पर्याय ठरेल.

ट्रॅप्ड

विक्रमादित्य मोटवने दिग्दर्शित ‘ट्रॅप्ड’ हा थरारपट आहे. या चित्रपटाची कथाकल्पना तरी नक्कीच चांगली आहे. एका अपार्टमेंटमध्ये अन्न-पाण्याविना अडक लेल्या तरुणाची कथा या चित्रपटात रंगवण्यात आली आहे. चित्रपटाच्या विषयानुसार हा एकाच खोलीत घडणारा चित्रपट आहे. याआधी अशा संकल्पनेवरचे चित्रपट यशस्वी ठरले आहेत. राजकुमार रावची या चित्रपटात मुख्य भूमिका असून त्याने यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

मशीन

‘मशीन’ चित्रपटाची गोष्ट ऐकण्यासारखी नाही. रोमॅंटिक अ‍ॅक्शनपट असलेल्या या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक द्वयी अब्बास-मस्तान यांची आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमागचा उद्देशच अब्बास-मस्तान खानदानातील चिराग मुस्तफा याला बॉलीवूडमध्ये ‘ब्रेक’ मिळवून देण्यासाठी केलेला असल्याने त्याचे महत्त्व सुज्ञ प्रेक्षकांच्या लक्षात यावे. चित्रपटाची नायिका कियारा अडवाणी आहे. तिने आधी ‘एम.एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी’मध्ये काम केलेले आहे. चित्रपटातील दोन रिमिक्स गाणी ‘तु चीज बडी है मस्त’ आणि ‘एक चतुर नार’ ही गाणी लोकप्रिय झाली आहेत. या अशा दोन-तीन गोष्टींवर ही ‘मशीन’ आजमवायची की नाही हे ठरवावे लागेल.

आ गया हिरो

‘आ गया हिरो’ हा अर्थातच गोविंदा नामक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्याच्या येण्याचे गोडवे गाणारा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वत: गोविंदाने केली आहे, त्याहीपेक्षा चित्रपटाची कथाही त्यानेच लिहिली आहे हे विशेष. एक आदर्श, प्रामाणिक आणि निडर पोलीस अधिकारी कायदे तोडणाऱ्यांच्या नाकीनऊ आणतो, अशी ही कथा आहे. हा निडर पोलीस अधिकारी कोण हे वेगळे सांगायला नको. यात रिचा शर्मा ही अभिनेत्री गोविंदाची नायिका आहे. या हिरोचे स्वागत कसे होईल, हीसुद्धा उत्सुकतेची बाब आहे.

ब्युटी अँड द बीस्ट

डिस्नेच्याच ‘ब्युटी अँड द बीस्ट’वर हा चित्रपट आधारित आहे. ‘हॅरी पॉटर’ फेम अभिनेत्री एम्मा वॅटसनची भूमिका हे या चित्रपटाचे आकर्षण आहे. १९९१ साली पहिल्यांदा ‘ब्युटी अँड द बीस्ट’ हा चित्रपट अ‍ॅनिमेटेड स्वरूपात प्रदर्शित केला होता. तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेली ही परीक था पहिल्यांदाच भव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.