३१ दिवस

अपंगत्वावर यशस्वीपणे मात करणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असतात. त्यांची जिद्द, त्यांची कौशल्ये आपल्याला तोंडात बोटे घालायला लावतात. पण सुदृढ व्यक्तीला जेव्हा अपघाताने अपंगत्व येते तेव्हा ते सत्य स्वीकारण्यापासून त्यातून सावरण्याचा त्याचा प्रवास खचितच सोपा नसतो. आशीष भेलक र दिग्दर्शित ‘३१ दिवस’ या चित्रपटातून अशीच एक जिद्दीची कथा रंगवण्यात आली आहे. अत्यंत चांगल्या कल्पनेवरचा हा चित्रपट पण विषयाची मांडणी करण्यासाठी नमनालाच घडाभर तेल टाकण्याच्या प्रयत्नात एक चांगला विषय अर्धवट राहिला, अशी भावना चित्रपट पाहताना होते.

‘३१ दिवस’ ही मकरंद सावंत (शशांक केतकर) या तरुणाची कथा आहे. चित्रपट दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पाहणारा मकरंद कॉलेजमध्ये एकांकिका-नाटक दिग्दर्शित करतो आहे. एकीकडे तो स्वत:च्या चित्रपटासाठी पटकथाही लिहितो आहे. त्याचा हा संघर्ष सुरू असताना त्याला मुग्धा (मयूरी देशमुख) भेटते. मुग्धाशी ओळख, प्रेम आणि मग लग्नापर्यंत त्यांची कथा लांबते. याच दरम्यान मकरंदची ओळख मीराशी (रीना अगरवाल) होते. मीरा अंध आहे, पण एखाद्या डोळस व्यक्तीसारखी ती सराईतपणे वावरते, स्वत:चा उद्योग सांभाळते. मीरासाठी अंध मुलांचे नाटक बसवण्याचे काम मकरंद पूर्ण करतो. मकरंद – मुग्धा आणि मीरा असा प्रेमत्रिकोण उभा राहतो की काय?, अशी शंका आपल्या मनात डोकावणार इतक्यात मकरंद – मुग्धाचे लग्न होते. मीराची गोष्ट मागे पडते. मग तिचा प्रवेशच का झाला?, याचे उत्तर चित्रपटातच पाहिलेले बरे! दरम्यानच्या काळात मकरंद लग्नानंतर कॉस्च्युम दिग्दर्शक म्हणून मालिकेच्या सेटवर काम स्वीकारतो आणि अगदी योगायोगाने त्या मालिकेचा दिग्दर्शक होतो. त्याच योगायोगात त्याच्या पटकथेवर चित्रपट करायला एक मोठा निर्माता तयार होतो आणि तो चित्रपट दिग्दर्शक म्हणून पुढेही येतो. मात्र यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार असतानाच मकरंदला अपघात होतो. त्यानंतर खऱ्या कथेला, विषयाला, संघर्षांला सुरुवात होते.

चित्रपटाचा पूर्वार्ध हा दिग्दर्शकाने मकरंदचा पूर्ण प्रवास दाखवण्यात का खर्ची घातला? ही अनाकलनीय गोष्ट आहे. चित्रपटाच्या शीर्षकाचा संदर्भही चित्रपट संपतानाच्या शेवटच्या अर्ध्या तासापूर्वी येतो. त्यातला मकरंदचा संघर्ष हा खरोखरच महत्त्वाचा आणि औत्सुक्याचा विषय होता. त्याची मांडणीही दिग्दर्शकाने प्रभावी केली आहे. विशेषत: मकरंद चित्रपट ज्या पद्धतीने धडाडीने पूर्ण करतो, त्यासाठी तो जे प्रयत्न घेतो तो भाग खूपच चांगल्या पद्धतीने चित्रित झाला आहे. मात्र हाच भाग उत्तरार्धात उशिराने पाहायला मिळतो. त्याच्या आधीचा भाग हा प्रेमकथा, गाणी आणि एका ठरावीक साच्यात सरकणारी गोष्ट याने भरलेला आहे. मकरंदच्या भूमिकेला १०० टक्के न्याय देण्याचा प्रयत्न अभिनेता शशांक केतकर याने केला आहे. शेवटच्या काही प्रसंगांमध्ये त्याने आपल्या सहजशैलीने ही भूमिका उत्तम वठवली आहे. मात्र पूर्वार्धात त्याला फारसा वाव मिळालेला नाही. मयूरी देशमुखनेही मधुराची भूमिका छान निभावली आहे. मात्री रीना अगरवालने साकारलेली अंध मीरा जास्त भाव खाऊन गेली आहे. अत्यंत महत्त्वाचा असा विषय प्रभावीपणे मांडला गेला असता तर नक्कीच त्याचे महत्त्व वाढले असते. मात्र सरधोपट मांडणी आणि रेंगाळलेला पूर्वार्ध यामुळे खूप चांगला, वेगळा विषय असतानाही ‘३१ दिवस’चा परिणाम मर्यादित ठरतो!

दिग्दर्शक – आशीष भेलकर

कलाकार – शशांक केतकर, मयूरी देशमुख, रीना अगरवाल, राजू खेर, सुहिता थत्ते, विवेक लागू, आशा शेलार, अरुण भडसावळे.