कोणत्याही सिनेमासाठी नायक जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच खलनायकाची भूमिकाही तेवढीच महत्त्वपूर्ण असते. खलनायकांचे नाव घेतले की सर्वात आधी कोणाचे नाव येत असेल ते म्हणजे अमरिश पुरी यांचेच. त्यांचा खलनायक साकारणं आजही कोणाला शक्य झालं नाही. पण तुम्हाला माहित आहे का अशा अनेक खलनायकी व्यक्तिरेखा आहेत ज्या साकारण्यासाठी दुसऱ्याच कोणा अभिनेत्याला विचारण्यात आले होते. आज आम्ही तुम्हाला त्याच कलाकारांची माहिती देणार आहोत…

राणा डग्गुबती- ही व्यक्तिरेखा माहित नसलेला एकही सिनेप्रेमी आपल्याला दिसू शकत नाही. मेगाब्लॉकबस्टर बाहुबली सिनेमाचा भल्लालदेव हा एक महत्त्वपूर्ण भाग होता. प्रदर्शनावेळी या सिनेमाची एवढी चर्चा होती की प्रत्येकाच्या तोंडी या सिनेमाशिवाय दुसऱ्या कोणाचेच नाव नव्हते. पण तुम्हाला माहित आहे का भल्लालदेव ही व्यक्तिरेखा सुरूवातीला जॉन अब्राहमला विचारण्यात आली होती. पण जॉनने ही भूमिका कोणताही विचार न करताच नाकारली. आज त्याला त्याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होत असेल.

शाहरुख खान- यशराजची निर्मिती असलेला डर सिनेमा तुम्हाला तर माहितीच असेल. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमात जुही चावला, सनी देओल आणि शाहरुख खान यांची मुख्य भूमिका होती. या सिनेमात शाहरुखने राहुल मेहरा ही नकारात्मक भूमिका साकारली होती. पण शाहरुखचा ही भूमिका सुरूवातीला आमिर खानला देण्यात आली होती. पण आमिर एक नायक म्हणून हिट होता म्हणूनच त्याने नकारात्मक भूमिका करायला नकार दिला. त्यानंतर शाहरुखला या व्यक्तिरेखेसाठी विचारण्यात आले आणि शाहरुखने मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

शक्ती कपूर- अंदाज बॉलिवूडमध्ये शक्ती कपूर यांच्याकडे नकारात्मक भूमिकांचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून पाहिले जाते. शक्ती यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दीत जास्तीत जास्त नकारात्मक भूमिकाच केल्या आहेत. पण अंदाज अपना अपना या सिनेमातील क्राइम मास्टर गोगो ही त्याची सर्वात आवडती भूमिका आहे. पण ही भूमिका सुरूवातीला टीनू आनंद यांना देण्यात आली होती. पण आनंद यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला, त्यामुळे शेवटी शक्ती कपूर यांच्याकडे ही भूमिका गेली.

अमरीश पुरी- मिस्टर इंडिया सिनेमाही या गोष्टीला अपवाद नाही. अमरीश पुरी यांच्याशिवाय ही व्यक्तिरेखा दुसऱ्या कोणी साकारली असती यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. पण सिनेमासाठी अमरीश ही काही पहिली पसंती नव्हती. सुरूवातीला अनुपम खेर यांना या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण इतर सिनेमांमुळे अनुपम मिस्टर इंडियाच्या चित्रीकरणासाठी कमी वेळ देऊ लागले. शेवटी अनिल कपूरने अमरिश पुरी यांचे नाव बोनी कपूर यांच्यासमोर ठेवले.

अमजद खान- शोले सिनेमाशिवाय खलनायकी भूमिकांची यादी पूर्ण होऊच शकत नाही. गब्बरला प्रेक्षक आजही विसरले नाहीत आणि भविष्यात विसरणंही शक्य नाही. या सिनेमातील छोटी- मोठी प्रत्येक व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाली. प्रेक्षकांना या सिनेमातील जय- विरु, कालिया, सांभा, ठाकुर एवढंच काय नोकर रामलाल यांसारख्या व्यक्तिरेखांचे काम आजही लख्ख आठवते. पण या सगळ्यापेक्षा शोले सिनेमा आठवतो तो म्हणजे गब्बरसाठीच. अमजद खान यांना ही भूमिका देण्याआधी डॅनी डेन्जोंगपाला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण इतर सिनेमांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे डॅनी यांनी सिनेमाला नकार दिला. अखेर दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी अमजद खान यांना विचारले. अमजद यांनी ही भूमिका अजरामर केली.