जगभर साहित्य किंवा कादंबऱ्या वाचणाऱ्यांचे स्तर विभागले गेले आहेत. खुपविके म्हणजेच बेस्टसेलर म्हणून अमेरिकेतून प्रचारित केलेले कथन-अकथनात्मक साहित्य वाचणारे सशुद्ध विज्ञान साहित्य वाचणाऱ्यांपासून वेगळे पडतात. रहस्य-थराराची मौज वाचणारे हलक्या-फुलक्या रोमॅिंण्टक कादंबऱ्यांच्या वाचकांहून वेगळे भासतात. स्वविकासात्मक, फॅन फिक्शन वाचणाऱ्यांची नवी प्रजातीच विस्तारत आहे. तर गुन्हेगारी-थरारक कादंबऱ्यांचा वेगळा असा खास वाचकवर्ग आहे. स्टीव्हन किंग, कार्ल हियासन, एलमोर लेनर्ड या पहिल्या फळीच्या कादंबरीकारांवर पोसलेल्या लेखकांची फळीच आजचे गुन्हेगारी साहित्य प्रसवत आहे. त्यांच्या प्रभावांमध्ये पल्प फिक्शनपासून नव्वदोत्तरी गुन्हेगारी सिनेमांचाही सहभाग आहे. या ताज्या गुन्हेगारी कादंबऱ्यांचे जेव्हा चित्रपटीय रूपांतर होते, तेव्हा सिनेमातील सारी प्रभावळ लख्ख स्पष्ट व्हायला लागते. ‘सिक्स्टीएट किल’ या ताज्या चित्रपटाला पाहिल्यानंतर गेल्या तीन-चार दशकांमधील गुन्हेगारी साहित्याने स्वीकारलेले रांगडेपण, सामाजिक बेगडीपणाचे वाढत चाललेले हिंस्र रूप आणि  सिनेमांचा अधिक हिंसाळलेला शैलीदार आराखडा यांचे संमीलन पाहायला मिळते.  ब्रायन स्मिथ या अमेरिकी लेखकाची तुलना करायची तर आपल्याकडे आज दर्जेदार गुन्हेकथाच लिहिल्या जात नाहीत. मात्र एकेकाळी गुरुनाथ नाईक आणि बाबूराव अर्नाळकर ज्या तोडीची वाचनभानामती घालूनही मुख्य धारेच्या बाहेरचे लेखक म्हणून ओळखले जात, तसेच आज ब्रायन स्मिथ या गुन्हेगारी कथालेखकाबाबत अमेरिकेत होत आहे. फक्त गुन्हेगारी कथा वाचणाऱ्या स्तरातील वाचकांमध्ये त्याचा तारांकित वावर आहे.

‘सिक्स्टीएट किल’ हा चित्रपट पाहण्यासाठी तो ज्याच्या पुस्तकावर आधारला आहे त्या ब्रायन स्मिथ या लेखकाचा किंवा त्याच्या वेगवान गुन्हेकादंबऱ्यांचा तपशील माहिती नसला, तरी चित्रपट पहिल्या क्षणापासूनच पकड घेतो, ते त्यातल्या नायिकेच्या स्त्रीवादी हिंसेतून. उमा थर्मन या अभिनेत्रीने ‘किल बिल’ चित्रपटात साकारलेली रांगडी व्यक्तिरेखा बाळबोध वाटावी अशी इथली ननायिका लिझा (अ‍ॅनलिन मकर्ड) आहे. ही ननायिका यासाठी की, तिचे सर्वच काम क्रूर गुन्हेगारालाही लाजवेल इतक्या थंड डोक्याचे आहे. अन् या चित्रपटात येणाऱ्या सर्वच स्त्रिया या पुरुषी रांगडेपणावर मात करणाऱ्या उग्रच आहेत. त्या साधणारा बेहिशेबी संवाद आणि गाठणाऱ्या टोकाच्या कृत्यांची स्पर्धाच लागली आहे.

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे

इथला नायक चिप (मॅथ्यू ग्रे गब्लर) स्त्रियाकृत हिंसेच्या चरक्यातून पुरता चिपाड झालेला भाबडा अन् पापभीरू व्यक्ती आहे. मैला वाहून नेणाऱ्या ट्रकवर तो रोजंदारी करतो आणि उरलेल्या सर्व वेळेत लिझा या स्ट्रिप क्लबमध्ये नाचणाऱ्या तरुणीवची प्रेमापोटी चाकरी करतो. ताटाखालच्या मांजर अवस्थेतच लिझा चिप याला भरपूर पैसे कमावण्याच्या उद्योगात येण्यास भाग पाडते. हा उद्योग असतो स्ट्रिप क्लबच्या मालकाची तिजोरी फोडून त्यात दाखल झालेले ६८ हजार डॉलर पळविण्याचा. चिप तिच्यासोबत जबरदस्तीने या कार्यात ओढला जातो. चोरी यशस्वी होते ती लिझाकडून सहजरीत्या दोन खून पाडण्यातून. हत्या आणि रक्त पाहून भांबावलेल्या चिपसमोर आणखी नवी जबाबदारी येते ती हत्या करताना पाहणाऱ्या तरुणीचे अपहरण करण्याची. अपहरण केलेल्या तरुणीचे आत्यंतिक क्रूर भवितव्य दिसल्यानंतर चिप पहिल्यांदाच लिझाशी दगाफटका करतो. लुटीचे ६८ हजार घेऊन तो त्या अपहरण केलेल्या मुलीसोबत पळ काढतो. पण गोष्टी अजिबातच सरळ राहत नाहीत. चिप एका क्रूर स्त्री अत्याचारातून सुटून दुसऱ्या स्त्रीकडे अत्याचारांची नवी चव घेण्यासाठी पुरता अडकला जातो.

सिक्सटीएट किल सरळसाधा चित्रपट नाही. गुन्हेपटांची सरधोपट वाट तो कधीच धरत नाही. पैसा पळविल्यानंतर दोन व्यक्तींमध्ये होणारे बेबनाव आणि ढळणारी नतिकता येथे फार गमतीशीर आणली आहे. न्वार सिनेमासारख्या इथल्या सगळ्या व्यक्तिरेखा करडय़ा रंगामध्ये आहेत. जाणीवपूर्वक इथल्या स्त्री-व्यक्तिरेखा पुरुषांहून सरस दाखविल्या आहेत. टेरेन्टीनोच्या दरोडेपटांपासून ते बी ग्रेड मारधाडीच्या चित्रपटांपर्यंतचे अनेक प्रभाव या चित्रपटाच्या पटकथेमध्ये आणि कादंबरीच्या  मूळ कथेत आहेत. ‘अमेरिकन सायको’ आणि ‘फाइट क्लब’ या गुन्हेथरार कादंबऱ्यांवरून आलेले दोन चित्रपट दोन दशकांपूर्वी प्रचंड लोकप्रिय झाले होते. मधल्या कालावधीत गुन्हेपट आणि गुन्हेगारी कादंबऱ्यांचे जग विस्तारले. ते नक्की कुठवर पोहोचले आहे, हे तपशिलात ‘सिक्स्टीएट किल’मध्ये पाहायला मिळते. व्हिडीओ गेम्स आणि सिनेमांचा वेग यामुळे हिंसा कार्टूनिश वाटण्याच्या आजच्या काळाला सुसंगत असा हा चित्रपट आहे. त्यातले कलाकार हॉलीवूडच्या पहिल्या फळीतील नसले, तरी त्यांचा अभिनय मात्र खणखणीत आहे. हा चित्रपट पुस्तकाइतकीच प्रेक्षकावर भानामती घालतो आणि त्यातील स्त्रीवादी हिंसाचाराचे विनोदी टोक आवडूनच जाते.