‘आत्रेय’ संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारे ‘आचार्य अत्रे मानचिन्ह’ यंदा ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाले आहे. आचार्य अत्रे यांच्या ११६ व्या जयंतीच्या निमित्ताने १३ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे मानचिन्ह पं. मंगेशकर यांना प्रदान केले जाणार आहे. मानचिन्ह वितरणानंतर अशोक हांडे यांच्या ‘चौरंग’ संस्थेतर्फे ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’हा कार्यक्रम साद केला जाणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन हांडे यांचे असून कार्यक्रमातून आचार्य अत्रे यांचे अष्टपैलुत्व या कार्यक्रमातून उलगडण्यात येणार आहे.
आचार्य अत्रे यांच्या कन्या कवयित्री व लेखिका शिरीष पै यांचे सुपुत्र व अत्रे यांचे नातू अ‍ॅड. राजेंद्र पै, अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे, अशोक हांडे यांनी याविषयी माहिती दिली. सायंकाळी पावणेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. परचुरे प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘कऱ्हेचे पाणी’ (खंड सातवा) आणि शिरीष पै लिखित ‘हे का हायकू’ या ग्रंथाचे तसेच डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आचार्य अत्रे लिखित ‘गुद्दे आणि गुदगुल्या’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन या वेळी होणार असल्याची माहिती राजेंद्र पै यांनी दिली.
‘कऱ्हेचे पाणी’ या ग्रंथाविषयी मीना देशपांडे म्हणाल्या, १९६५ नंतरच्या महाराष्ट्रातील महत्वाच्या घटना, त्यावर आचार्य अत्रे यांनी लिहिलेले लेख, ‘मराठा’मधील अग्रलेख याचे संकलन/संपादन या सातव्या खंडात करण्यात आले आहे. तर हांडे यांनी सांगितले, ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ कार्यक्रमातून आचार्य अत्रे यांचे अष्टपैलुत्व उलगडण्याचा आमचा प्रयत्न आहे. डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळे यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या कन्या राधा मंगेशकर या हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी या वेळी सादर करणार आहेत.