वॉंटेड, सिंघम, दबंग२ या हिंदी चित्रपटातील आपल्या खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अभिनेता प्रकाश राज यांना आता हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे. दाक्षिणात्य चित्रपटांपासून आपल्या अभिनयाला सुरुवात केलेल्या प्रकाश राज यांनी तेथील अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलंय.
मला एका हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे. सध्या तरी त्यावर काम सुरू आहे. लवकरच तुम्हाला त्याबद्दल माहिती देईनच. तूर्ततरी यापेक्षा जास्त काही सांगायचे नाही, असे प्रकाश राज यांनी सांगितले.
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या कलाकारांना नायकाची किंवा खलनायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळते आहे. त्यातूनच मला दोन-तीन हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली असे सांगून प्रकाश राज म्हणाले, जंजीरच्या रिमेकमध्ये मी तेजाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांना माझी ती भूमिकासुद्धा नक्की आवडेल, असा विश्वास वाटतोय. मूळच्या जंजीरमध्ये ही भूमिका अजित यांनी केली होती.