अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ या सिनेमाने आतापर्यंत १०६ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यातही चांगला व्यवसाय केला. फक्त १८ कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने अपेक्षेपेही जास्तच कमाई केली आहे. पण हा सिनेमा ज्या व्यक्तिवर आधारित होता त्या व्यक्तीला मात्र फक्त ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. सिनेमात भूमी पेडणेकरने अक्षय कुमारच्या पत्नीची म्हणजे जयाची व्यक्तिरेखा साकारली होती. ही व्यक्तिरेखा अनीता नारे या महिलेवर आधारित आहे. २०१२ मध्ये अनीताने घरात शौचालय नसल्यामुळे लग्नानंतर सासर सोडले होते.

असे चित्रीत झाले सलमान आणि त्याच्या शेजाऱ्यांचे घर

अनीता यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘मी हा सिनेमा पाहिला आणि मला तो आवडलाही. या सिनेमाची संपूर्ण कथा माझ्या आयुष्यावर बेतलेली आहे. पण सिनेमाच्या शेवटला दाखवण्यात आलेला माझा फोटो काही सेकंदांमध्येच निघून जातो. हा सिनेमा सध्या कोटींच्या कोटी उड्डाणे घेत असताना निर्मात्यांनी मला फक्त ५ लाख रुपये दिले. जर निर्मात्यांनी मला थोडी जास्त रक्कम दिली तर माझी आर्थिक स्थिती सुधारू शकते. मी या संदर्भात निर्मात्यांशी बोलले असता त्यांनी करार परत देऊन न्यायालयात जाण्यास सांगितले.’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ सिनेमाचे दिग्दर्शक श्रीनारायण सिंग आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर हे अनीता यांना भेटायला त्यांच्या गावी गेले होते. तिथे त्यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. पण अनीता यांना इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांनी हा करार गावातील इतर लोकांकडून वाचून घेतला आणि मग यावर स्वाक्षरी केली. पण आता अनीता ५ लाख रुपयांवर समाधानी आहे. तिला आनंद आहे की तिच्या आयुष्यातील या महत्त्वपूर्ण गोष्टीने लोकांमध्ये जागरुकता येत आहे.