भक्ती परब

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चार र्वष अभिनय केल्यानंतर एरिका फर्नाडिस हिने ‘कुछ रंग प्यार ऐसे’ या मालिकेतून हिंदी मालिकांमध्ये दमदार प्रवेश केला. त्याच वेळी तिला ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेची विचारणा झाली होती. आणि तिने होकार दिला होता. डॉ. सोनाक्षी या व्यक्तिरेखेमुळे ती अल्पावधीतच छोटय़ा पडद्यावर लोकप्रिय झाली. आता ती प्रेरणाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. असेच पार्थ समाथानच्या बाबतीत घडले. त्यानेही पाच-सहा मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. पण त्याला अभिनेता म्हणून ओळख ‘कैसी ये यारिया’ मालिकेतील मानिक मल्होत्राच्या भूमिकेने मिळवून दिली. त्यानंतर आता तो छोटय़ा पडद्यावर अनुराग बासूच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी या जोडीसोबत गप्पा मारण्याचा योग जुळून आला.

आपल्या भूमिकेविषयी पार्थ म्हणाला की, मानिक मल्होत्राच्या व्यक्तिरेखेपेक्षा ही खूप वेगळी व्यक्तिरेखा आहे. अनुरागच्या व्यक्तिरेखेत साधेपणा आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे त्याचं तत्त्वं आहे. अनुरागच्या आयुष्यात काय काय घडतं, कोण कोण त्याच्या आयुष्यात येतं, त्यांच्याशी त्याचं नातं कसं आहे.. या सगळ्यातून अनुरागची व्यक्तिरेखा फुलणार आहे. आणि हेच आव्हान आहे, असं तो म्हणाला. तो सेटवर पहिल्या दिवशी गेला तेव्हा त्याला कळलं की हा अनुराग आजचा आहे. तो समजूतदार आहे, कुटुंबाला धरून आहे. तो जग काय म्हणेल असा विचार न करता त्याला जे मनापासून वाटतं ते तो आत्मविश्वासाने करतो. असं पार्थ म्हणाला. चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी तो म्हणाला की, पहिल्या दिवशी सेटवर आम्ही महाविद्यालयातलं एक छोटेसं दृश्य चित्रित केलं. अनुराग आणि प्रेरणाच्या भेटीचं ते दृश्य होतं. त्या दृश्यानंतर माझ्या मनात असा विचार आला की, प्रेक्षकांना एकतर ही व्यक्तिरेखा अतिशय आवडेल किंवा अजिबात आवडणार नाही. अनुरागसाठी प्रेम म्हणजे त्याचं कुटुंब आहे. आई-वडिलांना तो खूप मानतो. अनुराग हा आजचा असूनसुद्धा आजचा नाहीय. असं पार्थ ठामपणे म्हणाला. अनुरागचे प्रेमाविषयी विचार बदलतात का.. हे सगळं बघायला प्रेक्षकांना मजा येईल, असं पार्थने सांगितलं. पार्थला प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करायची आहे. त्याला अजूनही मानिकची व्यक्तिरेखा जास्त जवळची वाटते, कारण ती व्यक्तिरेखा माझ्या व्यक्तिमत्त्वातच होती असं तो म्हणतो.

नव्या पिढीचा कलाकार म्हणून त्याचं असं मत आहे की, माध्यमं वेगवेगळी येत आहेत, यामुळे लेखनाला महत्त्व आलं आहे. कथा आवडली तर प्रेक्षक कुठल्याही माध्यमाकडे ओढले जातात, ते दूरचित्रवाणी बघतील, ते वेबसीरिज बघतील, ऑनलाइन इतर काही गोष्टी बघतील. पण कथेलाच महत्त्व आहे. या वेळी अभिनेता म्हणून आव्हान हे असतं की, व्यक्तिरेखांकरवी तुम्ही त्यांच्या मनात स्वत:चं स्थान कसं निर्माण करता.

आपल्या व्यक्तिरेखेविषयी एरिका फर्नाडिस म्हणाली की, दूरचित्रवाणीवर काम करताना व्यक्तिरेखा फारशा बदलत नाहीत. व्यक्तिरेखा त्याच असतात, पण त्यांच्या आयुष्यात घडणारे घटना-प्रसंग, परिस्थिती वेगवेगळी असते. म्हणून मी प्रेरणाच्या भूमिकेसाठी जास्त मेहनत घेतली नाही. कारण लेखकांवर माझा विश्वास आहे. ती भूमिका त्यांच्या दृष्टिकोनातूनच माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. खूप सुंदररीत्या ही मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत, असं एरिका आत्मविश्वासाने म्हणाली. दूरचित्रवाणी माध्यमात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी बालाजी टेलिफिल्म्ससाठी काम करणं ही खूप मोठी गोष्ट असते. यांच्यासोबत काम करायला एकदा तरी मिळावं अशीच प्रत्येकाची इच्छा असते, असं तिने सांगितलं.

चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी ती म्हणाली, सेटवरचं वातावरण इतकं मस्त असतं की, दुसऱ्या दिवशी पुन्हा सेटवर तितक्याच उत्साहाने जावंसं वाटतं. कधी चित्रीकरण नसलं तरी सेटवर जाते. एरिका दाक्षिणात्य चित्रपटात काम करत होती, त्यानंतर ती मालिकांकडे वळली, त्यामुळे तिला मालिकांच्या राज्यात रुळायला एक महिना लागला. त्याविषयी ती म्हणते, चित्रपटात तुम्ही एकदा भूमिका साकारली की संपलं, पण मालिकेत तुम्हाला सतत काहीना बदल त्या व्यक्तिरेखांच्या दृष्टीने करावा लागतो. काही चुका होत असतील तर त्या सुधारण्याची संधी मिळते. माझ्यातल्या अभिनेत्रीला दूरचित्रवाणीने अधिक घडवलं, चित्रपटांपेक्षा. असं ती म्हणते. तिला अशा मालिकेत काम करावंसं वाटतं, ज्यातली व्यक्तिरेखा प्रेक्षकांशी जोडली जाईल. त्या व्यक्तिरेखेत मी माझी मलाच पाहू शकेन. हिंदी मालिकांमध्ये प्रेमाविषयी, नातेसंबंधाविषयी आजवर खूप काही दाखवलं गेलं आहे, याविषयी ती म्हणाली की, प्रेम ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. प्रेमावर विश्वास ठेवा. प्रेम तुमच्या आयुष्यात येतं तेव्हा तुमच्याही नकळत तुमच्यात बदल घडतो. तिला एकता कपूर यांनी असं सांगितलं होतं की, प्रेमाने तुम्हाला बदललं नाही, तर ते प्रेम प्रेम नाही.. हे वाक्य एरिकाचं अतिशय आवडतं वाक्य आहे. ती पुढे म्हणाली, आजच्या बदललेल्या जीवनशैलीत लोक कामाला, व्यवसायाला जास्त महत्त्व देतात. पण त्यापेक्षा कुटुंबाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, कारण कुटुंबाची साथ मिळणं, यासारखं दुसरं सुख नाही. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच तुम्ही आयुष्यात चांगल्या गोष्टी करू शकता. त्याचबरोबर आदर महत्त्वाचा आहे. आपण व्यक्ती कशाही असोत, त्यांचा आदर राखला पाहिजे. आदरामुळे तुम्हाला त्या गोष्टींचं मूल्य कळतं. आपलं कुटुंब आणि व्यावसायिक आयुष्य यांतील समतोल साधता आला पाहिजे, असं एरिका म्हणाली, तिला शूरवीर योद्धय़ाची भूमिका करायची आहे असंही तिने सांगितलं.

एकूणच प्रेरणा आणि अनुरागची मस्त जोडी जमली आहे. दोघेही एकमेकांची चित्रीकरणादरम्यान खूप साथ देतात हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय जोडींमध्ये या दोघांमुळे आणखी एका सुंदर जोडीचा प्रवेश झालेला आहे. आता मालिका सुरू झाल्यावर ते प्रेक्षकांच्या कसोटीवर कसे खरे उतरतात याची उत्सुकता आहे.