पुरस्कार सोहळ्यात पं. जसराज यांचे गौरवोद्गार

संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रत्येक गाण्यात स्वत:चे अंतरंग ओतले असून  त्याच्या प्रत्येक गाण्याचे शब्द तो आत्मसात करतो. त्यांचे  प्रत्येक कलाकाराच्या हृदयात स्थान आहे, असे गौरवोद्गार पं. जसराज यांनी बुधवारी मुंबईत काढले.

षण्मुखानंद सभागृहात झालेल्या एका विशेष सोहळ्यात ज्येष्ठ पाश्र्वगयिका आशा भोसले यांच्या हस्ते पं. जसराज यांना यंदाचा ‘हृदयनाथ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,  विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, मीना खडीकर, उषा मंगेशकर आदी यावेळी उपस्थित होते. हृदयेश आर्ट्सचा वर्धापन दिन, पं. हृदयनाथ यांचे ८० व्या वर्षांत पदार्पण आणि ‘भावसरगम’ कार्यक्रमाचा सुवर्णमहोत्सव असा त्रिवेणी संगम जुळून आले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने पं. हृदयनाथ यांचा  या वेळी सत्कार करण्यात आला. आम्हा चौघी बहिणींना त्याचे गाणे गायला अजूनही भीती वाटते, असे सांगून आम्हा पाचही भावंडांना रसिकांचे खूप प्रेम मिळाल्याबद्दल आशा भोसले यांनी  यावेळी रसिकांचे आभार मानले.

सत्काराला उत्तर देताना पं. हृदयनाथ यांनी सांगितले, ‘भावसरगम’च्या कार्यक्रमासाठी मला ज्यांच्या शब्दांची साथ मिळाली त्या शांता शेळके, सुरेश भट, ग्रेस ही कवी मंडळी आज हयात नसल्याने वाईट वाटते आणि त्यांची खूप आठवण येते. या सोहळ्यासाठी लता दीदी उपस्थित नसल्याने अंधार पसरला असल्यासारखे वाटत आहे. सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या ‘भावसरगम’च्या विशेष कार्यक्रमात सुरेश वाडकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, देवकी पंडित, सलील कुलकर्णी, संजिवनी भेलांडे, मधुरा दातार यांचा सहभाग होता.