सर्वसामान्य लोकांसोबतच आता सेलिब्रिटी देखील वीज बिल जास्त आल्यामुळे त्रस्त झाले आहेत. अलिकडेच अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे, पूजा बेदी, हरभजन सिंह, दिव्या दत्ता यांसारख्या काही सेलिब्रिटींनी वीज बिल जास्त आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी देखील वाढीव वीज बिलाची तक्रार केली आहे. एवढं बिल कसं काय आलं? असा प्रश्न त्यांनी विज कंपनीला विचारला आहे.

अवश्य पाहा – सोनू सूद म्हणतोय, “ही वेब सीरिज नक्की पाहा”

इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार आशा भोसले यांना जून महिन्यात चक्क २ लाख ८ हजार रुपये इतकं बिल आलं. हे बिल त्यांच्या लोणावळामधील बंगल्याचं आहे. एप्रिल आणि मे महिन्यात त्यांना प्रत्येकी आठ हजार रुपये बिल आलं होतं, मग एका महिन्यात थेट दोन लाख रुपये बिल कसं काय येऊ शकतं? असा प्रश्न आशा भोसले यांनी विज कंपनीला विचारला आहे. महावितरणने (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) मात्र आशा भोसलेंचा प्रश्न फेटाळून लावला आहे. त्यांच्या बिलामध्ये काहीही घोळ झालेला नाही. मीटर रिडिंगप्रमाणेच बिल पाठवल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

VIDEO : ..अन् माणसांना पाहून सिंह पळू लागले; बिग बींनी सांगितला ‘तो’ अनुभव

का वाढवली जात आहेत विजेची बिलं?

राज्यातील अंदाजे २ कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या घरगुती वीज वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा जास्त आलेली आहेत. त्यामुळे प्रचंड संभ्रम व असंतोष निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षात या बिलांच्या वाढीची दोन प्रमुख कारणे आहेत, या कारणांबाबत वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

“वीज बिलं वाढण्याचे पहिले कारण नैसर्गिक आहे. मार्च ते जून हा पूर्णपणे उन्हाळ्याचा कालावधी असल्याने तसेच या काळात लॉकडाउनमुळे कुटुंबातील सर्वजण घरात बसून होते. त्यामुळे या काळात सर्व खोल्यांमधील दिवे, पंखे, टीव्ही, कॉम्प्युटर सुरू राहिल्याने वीज वापर वाढला आहे. दुसरे व महत्त्वाचे कारण म्हणजे १ एप्रिल २०२० पासून झालेली वीजेची दरवाढ. १ एप्रिलनंतर हे पहिलेच बिल आहे आणि आता आलेल्या बिलांतील अडीच महिने हे जादा वीज दराचे आहेत. ग्राहकांचा खरा असंतोष दरवाढीच्या विरोधात असायला हवा. पण दरवाढ माहीतीच नसल्याने बिले चुकीची आली आहेत, असा संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक ग्राहकांनी दरवाढीच्या विरोधात असंतोष, राग व नाराजी प्रकट करायला हवी,” अशी माहिती वीजतज्ज्ञ व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी येथे गुरुवारी दिली.