आशा भोसले हे नाव घेतलं की आपल्या समोर एक सुंदर आवाज आणि त्यांची गाणी येतात. मात्र नेटकऱ्यांनी आज आशा भोसले यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. त्यांच्यावर टीकेचा भडीमारही केला. याचंही कारणही तसंच आहे. आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्मान भारत योजनेचं कौतुक करणारं एक ट्विट केलं. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी या ट्विटला उत्तरं देत त्यांचा राग व्यक्त केला आहे.  ‘आयुष्मान भारत योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. तसेच ४६ लाख नागरिकांना या योजनेचा फायदा झाला, उपचारांसाठी मदत झाली त्यांचे आयुष्यच बदलले.’ या आशयाचे ट्विट आशा भोसले यांनी केले. मात्र या ट्विटवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करुन आशा भोसले यांना ट्रोल केले आहे.

एका नेटकऱ्याने तर आशा भोसले यांना थेट प्रश्न विचारला आहे की, ‘हे ट्विट करण्यासाठी तुम्हाला किती पैसे मिळाले?’ ‘तुम्ही बकवास करत आहात’, ‘हे पेड ट्विट आहे.’ ‘जरा एकदा सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन तिथली अवस्था काय आहे ते पाहा.’ ‘हे ट्विट केल्याबद्दल आता आशाताईंना पुरस्कारच दिला पाहिजे’ या आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

खरंतर ट्विटरवर काय पोस्ट करावं हा प्रत्येकाचा व्यक्तीगत निर्णय असतो. मात्र जेव्हा सेलिब्रिटी काही ट्विट करतात त्यावर अनेक नेटकरी व्यक्त होतात. काहीवेळा ट्विट करणाऱ्याचं कौतुक होतं. काहीवेळा ट्विट करणाऱ्याचा ट्विट पटला नाही तर त्याला ट्रोल केलं जातं. आज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी जो ट्विट केला आहे तो अनेक नेटकऱ्यांना पटला नाही. त्याचमुळे सरकारी रुग्णालयांची उदाहरणं देत अनेकांनी आशा भोसले यांना ट्रोल केलं आहे.