‘बागी २’ मधलं बहुप्रतिक्षीत ‘एक दोन तीन’ हे गाणं काही तासांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं. दोन दिवसांपूर्वीच जॅकलीन म्हणजेच ‘मोहिनी’नं आपल्या गाण्याची काही सेकंदाची झलक ट्विटरवर शेअर केली होती. या गाण्याचा ट्रेलर पाहून नवी मोहिनी कशी दिसेल याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता दोन दिवस ताणल्यानंतर या गाण्यांचा व्हिडिओ ट्विटर, युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या सिनेमातलं माधुरीचं ‘एक दोन तीन’ हे गाणं प्रेक्षकांनी तर अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं होतं. माधुरीच्या आयुष्यातला तर हा चित्रपट टर्निंग पाईंट होता. नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं. त्यातला माधुरीचा डान्स तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ९० च्या दशकात मैलाचा दगड ठरलेल्या या गाण्याचा रिमेक होणार हे कळ्यावर चाहत्यांना याबद्दल उत्सुकता होती तर जॅकलीनवर मात्र याचं दडपण होतं. माधुरीनं जसं सादरीकरण केलं तसं मला जमलं नाही, याबाबत त्यांची जागा कोणच घेऊ शकत नाही. मी मात्र हे गाणं त्यांना समर्पित करून त्यांच्यासारखंच उत्तम नाचण्याचा प्रयत्न केला अशी प्रांजळ कबुली यापूर्वीच जॅकलीननं दिली आहे. तेजाब हा चित्रपट १९८८ साली बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. ‘तेजाब’ला त्यावेळी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात १२ नामांकन मिळाली होती. माधुरी दीक्षितलाही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पहिलंवहिलं नामांकन मिळालं होतं.

बागी २ मधल्या या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन अहमद खान आणि गणेश आचार्य केलं आहे. गाण्याच्या संगीतात अर्थात पूर्वीपेक्षाही अधिक बदल करण्यात आले आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधितच ते सोशल मीडियाच्या ट्रेंडिंगच्या यादीत अव्वल ठरलं. ९० च्या दशकातील मोहिनीची जादू २०१८ मध्येही कायम ठेवायला जॅकलीन किती यशस्वी ठरतेय हे मात्र येत्या काही दिवसांत पाहण्यासारखं ठरेल.