हिंदीत अभिनेत्यांनी आपल्या चित्रपटातील एक तरी गाणे गाण्याची प्रथा आता रुळत चालली आहे. मराठीत अजून या प्रकाराबद्दल फारसा आग्रह दिसत नसला तरी आपल्याकडे अनेक गायक नट आहेत. आत्तापर्यंत विनोदी भूमिकांमधूनच समोर आलेले अभिनेते भारत गणेशपुरेही गायकाच्या भूमिकेत लोकांसमोर येणार आहेत. आगामी ‘बरड’ या चित्रपटात भारत गणेशपुरे यांनी गाणे गायले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या निमित्ताने भारत गणेशपुरे हे नाव घराघरांत पोहोचले आहे. एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी चाहत्यांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे. मात्र या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच गाणं गाण्याची संधी घेतली आहे. प्रमोद गोरे यांची निर्मिती असलेल्या तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बरड’ या चित्रपटासाठी त्यांनी गाणे गायले आहे. ‘कोणी माती खाल्ली रे’ असे या गाण्याचे बोल असून संगीतकार रोहन रोहन यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. जमीन खरेदी-विक्री व्यवहारामागचे वास्तव या चित्रपटात उलगडून दाखवले आहे. एखाद्या जागेचे भाव कशा पद्धतीने वाढवले जातात आणि सामान्य माणूस या जागेच्या व्यवहारांच्या या दुष्टचक्रात कसा अडकत जातो याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. चित्रपटाचा विषयच इतका वास्तव असल्याने त्यातलं दाहक सत्य गाण्याच्या माध्यमातून गमतीदारपणे उतरावं ही चित्रपटाची गरज होती. त्यानुसार मिथिला कापडणीस यांनी हे गाणे लिहिले, अशी माहिती संगीतकार रोहन यांनी दिली. या वेगळ्या ढंगातील गाण्यासाठी वेगळ्या आवाजाच्या आणि लहेजा असलेल्या गायकाचा शोध सुरू होता. त्याच वेळी भारत गणेशपुरे यांना हे गाणे गाणार का, याबद्दल विचारणा करण्यात आली. पहिल्यांदा त्यांनी गाणं गाण्यास नकारच दिला होता. मात्र प्रत्यक्ष गाण्याच्या रेकॉर्डिगच्या वेळी त्यांची कळी खुलली.