कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणारे टास्क, घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद- विवाद, भांडण, मैत्री हे सगळचं चर्चेचा विषय आहेत यात शंका नाही. बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत आहे. सदस्य एखाद्या मालिकेचे वा सिनेमामधील पात्र म्हणून लोकांसमोर येत नसून ते जसे आहेत तसे ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत कोणताही मुखवटा न बाळगता. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. नुकतीच हर्षदा खानविलकरची कार्यक्रमामध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एण्ट्री झाली होती. हर्षदा यांचा घरातील पहिला आठवडा चांगलाच रंगला. आता या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एण्ट्री होणार आहे.

या एण्ट्रीबद्दल बोलताना शर्मिष्ठा राऊत म्हणाली, ‘मी खूप उत्सुक आहे, आत नक्कीच खूप मजा येणार आहे, पण तितकच टेंशनसुध्दा आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेले सगळेच सदस्य माझे मित्र आहेत. पण मी माझा स्वतंत्र खेळ खेळणार हे नक्की. मी बिग बॉसची चाहती आहे. मीच माझी खूप मोठी स्पर्धक आहे असे मला वाटतं. या घरामध्ये मी माझा लढा लढेन आणि मीच स्वत:ला हा खेळ जिंकून देऊन शकते.’

‘टास्कबद्दल बोलायचं झालं तर, मला टास्क खूप आवडतात कारण माझ्या आयुष्यात देखील मला अॅडव्हेंचर खूप आवडतं मी आताच स्काय डायव्हिंग केलं आहे. त्यामुळे टास्ककडे खूपच सकारात्मकदृष्टीने पाहते. मी जशी माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये आहे तशीच मी या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये देखील वावरताना प्रेक्षकांना दिसेन, कारण कार्यक्रमाची टॅगलाइनच आहे दिसतं तसंच असतं. जिथे मला पटेल तिथे मी शांत असेन. पण जिथे मला पटणार नाही तिथे मात्र मी नक्कीच बोलणार’.

हर्षदानंतर आता वाइल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे शर्मिष्ठा राऊत घरामध्ये जाणार आहे. आता घरातील स्पर्धकांची काय प्रतिक्रिया असेल? घरामध्ये कोणते रंजक वळण येईल? हे पाहणे रंजक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.