टेलिव्हिजनचा सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा अकरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या नव्या सिझनमध्ये स्पर्धक कोण असणार, नवे नियम कोणते असणार याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी शोच्या निर्मात्यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचा चेहरा ‘बिग बॉस’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र या फोटोमधला चेहरा पूर्णपणे दिसत नाही.

ट्विटरवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये एका महिलेचा चेहरा झाकलेला असून तिचा फक्त एक डोळा पाहायला मिळतोय. नेमका हा फोटो कोणाचा आहे हेच समजत नाही आणि त्यामुळेच शोची उत्सुकता ताणली गेली आहे. ‘बिग बॉस ११ च्या सेटवरुन लाइव्ह एपिसोड पाहण्यासाठी या स्पर्धकाला ओळखा,’ असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलंय. अनेकांनी हा फोटो कोणाचा आहे हे ओळखण्यासही सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस’च्या फॅन पेजेसवरूनही काही उत्तरं पोस्ट केली गेली आहेत.

वाचा : ‘एअरपोर्टवरील लूकप्रमाणेच श्रद्धांजलीसाठीच्या लूकचाही ट्रेंड’

‘सेन बेनिम्सिन’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असाच काहीसा फोटो असल्याने एका ट्विटर युजरने ती महिला तुर्की लेखक बिटल एल्डॉन असल्याचं म्हटलंय. तर काहींनी तो फोटो इंग्लंडमधील मुस्लिम मॉडेल हालिमा मॅटलबचा असल्याचं म्हटलंय. आता ही स्पर्धक कोण आहे हे तर ‘बिग बॉस’च्या प्रिमीयर शोमध्येच स्पष्ट होईल.